
प्रेस नोट
अहिल्यानगर
बिबट्या दिसताच वाजणार सायरन; वन विभागाची अत्याधुनिक ‘एआय’ प्रणाली…
अहिल्यानगर (शिवप्रहार न्युज)- जिल्ह्यातील बिबट्या व मानव यांच्यातील वाढता संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचे पाऊल उचलले आहे. अहिल्यानगर वनविभाग व पुण्यातील ‘डी.ए.डी.ए. (दा.दा.) रिसर्च फाऊंडेशन’ संचलित ‘डावेल लाईफसायन्सेस’ यांनी संयुक्तपणे ‘एआय वाईल्ड नेत्रा’ ही स्वदेशी ‘इंटेलिजंट सर्व्हेलन्स सिस्टीम’ विकसित केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेला हा प्रायोगिक प्रकल्प आता नागरिकांच्या मदतीला धावून येणार आहे.
गस्त घालणे किंवा पिंजरे लावणे या पारंपरिक उपायांच्या पलीकडे जाऊन ही यंत्रणा काम करेल. या प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात वापरलेले प्रगत ‘कॉम्प्युटर व्हिजन’ व ‘डीप लर्निंग अल्गोरिदम’ हे आहे. सामान्य सेन्सर अनेकदा वाऱ्यामुळे हलणारी पिके किंवा कुत्र्यांच्या हालचालींवरही आवाज करू लागतात. मात्र, ‘एआय वाईल्ड नेत्रा’मधील अल्गोरिदम भारतीय बिबट्याच्या शरीररचनेवर विशेषत्वाने प्रशिक्षित करण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ बिबट्याची ओळख पटल्यावरच ही यंत्रणा कार्यान्वित होते व अचूक विश्लेषण करते.
बिबट्याप्रवण क्षेत्रे अनेकदा दुर्गम भागात असतात, जिथे मोबाईल नेटवर्क नसते. अशा वेळी इंटरनेटवर अवलंबून असलेल्या यंत्रणा कुचकामी ठरतात. यावर मात करण्यासाठी यात ‘एज कम्प्युटिंग’ तंत्रज्ञान वापरले आहे. कॅमेऱ्याने टिपलेला डेटा प्रोसेस करण्यासाठी इंटरनेटवरून सर्व्हरवर पाठवण्याची गरज यात भासत नाही. सर्व निर्णय प्रक्रिया त्या उपकरणावरच होते. डेटा तिथेच प्रोसेस होत असल्याने, बिबट्या दिसल्यावर तत्काळ सायरन वाजतो. नेटवर्क नसल्यानेही प्रतिसादात कोणताही विलंब होत नाही. तसेच, उच्च क्षमतेचे सौर पॅनेल्स व प्रगत बॅटरी व्यवस्थापन प्रणालीमुळे ही यंत्रणा चोवीस तास कार्यरत राहते. ऊस शेती व पावसाळी वातावरणात टिकून राहण्यासाठी ही यंत्रणा मजबूत बनवली असून, ती गरजेनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येते.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी बोलताना अहिल्यानगर वन विभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल म्हणाले, “बिबट्या – मानव संघर्ष व्यवस्थापनात आपण आता प्रतिक्रियात्मक भूमिकेतून प्रतिबंधात्मक भूमिकेकडे जात आहोत. नागरिकांना सुरक्षित वातावरणात राहता यावे, यासाठी वन विभाग कटिबद्ध आहे. यातील प्रगत एआय तंत्रज्ञानामुळे केवळ सायरन वाजत नाही, तर आपल्याला बिबट्यांच्या वर्तणुकीचा अचूक डेटाही मिळेल.”
हा प्रकल्प सध्या ‘प्रायोगिक अवस्थेत’ आहे. कोणत्याही संशोधनाचे यश हे लोकांच्या सहभागावर अवलंबून असते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या नवीन यंत्रणेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा तसेच आपल्या सूचना व अभिप्राय वन विभागाकडे नोंदवावेत, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे. भविष्यात नेटवर्क उपलब्ध झाल्यावर क्लाउड सिंक करून नागरिकांना थेट व्हॉट्सॲपवर अलर्ट व ‘एसओएस’ मेसेजची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विभागाचा मानस आहे.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015


















