A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

येडूआई यात्रेच्या जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवला – ज्ञानेश्वर अहिरे यांच्या पाठपुराव्याला यश 

हनुमंतगाव (वार्ताहर)- संपूर्ण राज्यातील आदिवासी भिल्ल समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पिंपळदरी ता.अकोले येथील येडू मातेच्या यात्रेवेळी लागणाऱ्या जागेचा प्रश्न सुटला असून अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेसाठी लागणाऱ्या जागेचा पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

      राज्यातील भिल्ल समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री क्षेत्र पिंपळदरी येथील येडूमातेच्या यात्रेवेळी जागेचा प्रश्न खूप भेडसावत होता.राज्यभरातून लाखो भिल्ल समाज या ठिकाणी उपस्थित राहत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये या यात्रेकरूंना वास्तव्य करावे लागत होते. त्यामुळे नेहमीच गावकरी व आदिवासी समाज यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होत होता.येडू आई देवस्थान वन विभागाच्या जमिनीवर आहे .तसेच मंदिराशेजारी अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून वन विभागाची जागा व्यापली आहे. त्यामुळे आदिवासींना नवसपुर्ती करण्यासाठी जागा नसल्याने खूप अडचणी निर्माण होत होत्या व अनेक कुटुंबांना यात्रेत नवसपुर्ती करण्यासाठी जागाच मिळत नव्हती‌.त्यामुळे प्रत्येक यात्रे वेळी गावकरी व आदिवासी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होत होता ‌. एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन‌ यात्रेवेळी चार दिवस येडू आई गड परिसर यात्रेसाठी राखीव करण्यात यावा अशी मागणी केली होती.तसेच ही यात्रा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात भरत असतानाही पिंपळदरी ग्रामस्थ यात्रेवर ताबा मिळवतात व आदिवासींकडून त्यांच्या जमिनीमध्ये राहण्यासाठी पैसे उकळतात व मंदिराच्या विकासाच्या नावाखाली पावत्या फाडतात. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकी किती जागेत यात्रा भरते अशी विचारणा संघटनेला केली होती,त्यानंतर एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे, राधाकृष्ण बर्डे,अनिल बर्डे,या पदाधिकाऱ्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून जवळपास 30 एकर जागेमध्ये यात्रा भरवली जाते असे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी कळवले. त्यानंतर मा.जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आदेश काढले आहेत व येडू आई यात्रा ज्या जागेत भरवली जाते त्या जागेचा सविस्तर पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून यात्रेवेळी आदिवासींना भेडसावणारा जागेचा प्रश्न कायमचा मिटणार असून आदिवासी भिल्ल समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्ञानेश्वर अहिरे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक कागदोपत्री पाठपुरावा केल्यानेच सदर यात्रेची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे.आगामी काळात यात्रेवेळी मुबलक जागा आदिवासींना मिळणार असून गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला संघर्ष कायम स्वरूपी मिटणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!