
समीर वानखेडे ब्यूरो चीफ:
चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या औद्योगिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर विविध उद्योगांवर कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य अभिजीत वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला असता मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रदूषण कमी करण्यासाठी तांत्रिक सुधारणा, धूळ नियंत्रण, स्वच्छता उपाययोजना आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यावर शासनाचा भर आहे. चंद्रपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी स्वतः भेट देणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत नियमित पाहणी करण्यात येत असून, पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर नियमांनुसार कडक कारवाई केली जाते.
मंडळाकडून उद्योगांची वेळोवेळी तपासणी करून पर्यावरणीय नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पडताळणी केली जाते. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. तसेच आवश्यकतेनुसार अंतरिम निर्देश व प्रस्तावित निर्देश जारी करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



