A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

'लोकतंत्र सेनानींमुळे आणीबाणीच्या कालखंडात लोकशाही व संविधानाचे रक्षण’

'लोकतंत्र सेनानींमुळे आणीबाणीच्या कालखंडात लोकशाही व संविधानाचे रक्षण’

           प्रेस विज्ञप्ति 
          राजभवन, मुंबई 

‘लोकतंत्र सेनानींमुळे आणीबाणीच्या कालखंडात लोकशाही व संविधानाचे रक्षण’

राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे आणीबाणीला 50वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय : संविधान हत्या दिवस 2025’ हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आणीबाणीच्या काळ्याकुट्ट कालखंडाला आज 50वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हवी की देशात लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्याही वेळी लोकतंत्र सेनानींनी मोठा संघर्ष करत, आपल्या देशाचे संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले. म्हणूनच आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधातील 12 जून 1975 चा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय, तसेच आणीबाणी लादण्यापूर्वी व नंतरची परिस्थिती यांचा विस्तृत आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला.

संविधानाची निर्मिती करत असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत म्हटले होते की, देशातील सर्वात शेवटच्या व्यक्तीला मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून मी एक मोठी शक्ती देत आहे. यावर जर कुणी गदा आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याविरुद्ध थेट उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. मात्र, आणीबाणीमध्ये 42व्या संविधान संशोधनाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आणीबाणीला विरोध करणाऱ्या देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना लाखोंच्या संख्येने तुरुंगात डांबण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्यात आला. 5, 11, 20 कलमी कार्यक्रमांच्या माध्यमातून सामान्य जनतेवर अन्याय केला गेला. माझेही वडील त्याकाळात 20 महिने तुरुंगात होते, अशी आठवण मुख्यमंत्री यांनी सांगितली. त्याकाळी सरकारविरोधात बोलणाऱ्या प्रत्येक आवाजाला दडपण्यात आले, वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादण्यात आली, मोठ्या प्रमाणात जमिनी बळकावण्यात आल्या, लग्न न झालेल्या पुरुषांचीही जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली. अनुशासनाच्या नावाखाली मूठभर लोकांकडून देशात अराजकता माजवण्यात आली. या सर्व घटनांमुळे देशात ठोकशाही व तानाशाहीची सुरुवात झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

याच कालखंडात जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांसारख्या अनेक थोर नेत्यांनी कारागृहात असतानाही हुकूमशाहीविरोधात आपला आवाज बुलंद ठेवून देशाच्या जनमानसात नवचेतना निर्माण केली. जेव्हा या दडपशाहीविरोधात जनआक्रोश उफाळून आला, तेव्हा नाईलाजाने इंदिरा गांधींना आणीबाणी मागे घ्यावी लागली. आणीबाणीच्या कालखंडामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले, अनेक कुटुंबांचे कर्ते 20-22 महिने तुरुंगात होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली. अशा लोकतंत्र सेनानींसाठी छोटीशी मदत म्हणून 2014 नंतर आपल्या सरकारने मानधनाची व्यवस्था केली असून ती आता कायमस्वरूपी सुरू राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोकशाही रक्षणासाठीच्या या प्रदीर्घ लढाईत लोकतंत्र सेनानींचे योगदान अतुलनीय आहे. जर त्यांनी त्या काळी तानाशाहीला विरोध केला नसता, तर आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात काहीही फरक राहिला नसता. त्यांच्या संघर्षामुळेच आज देशात लोकशाही व्यवस्था मजबुतीने उभी आहे. आजच्या प्रगल्भ जनतेमुळे आपली लोकशाही व संविधान चिरायू राहतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री अशोक उईके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Vande bharat Live tv news nagpur 
             Editor 
 Indian Council of press,Nagpur
            Journalist

Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!