A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी तांत्रिक अडचणीमुळे 26 मे पासुन

वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा

वृत्तसेवा :- अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर आता अर्ज नोंदणी व पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेला २६ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले. दहावीच्या निकालानंतर शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अकरावी प्रवेश प्रक्रियेला २१ मेपासून सुरुवात करण्यात आली. २१ मे ते १३ जूनदरम्यान होणाऱ्या पहिल्या फेरीसाठी अर्ज नोंदणी व पसंतीक्रम व उच्च माध्यमिक विद्यालयांची अलॉटमेंट इत्यादीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र २१ मे २०२५ रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ सकाळपासून तांत्रिक कारणास्तव बंद पडले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले हाते. त्यामुळे तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यासाठी लागणारा कालावधी आणि विद्यार्थी हित लक्षात घेत अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण संचालनालयाने जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी दुपारी ४ वाजता शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा २६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. प्रवेश प्रक्रियेबाबत २१ मे रोजी आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर शिक्षण संचालनालयाने सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे जाहीर केले होते. संकेतस्थळावर कोणतीही छोट्यात छोटी त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोईचे व सुलभ व्हावे, एकंदर प्रवेशाची कार्यवाही कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ व योग्य सोयी-सुविधा, विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्यामुळे कोणीही गोंधळून जाऊ नये, असे आवाहनही शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे. अकरावी प्रवेशाचा अर्ज भरताना पहिल्या दिवशी आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करणे शक्य झाले नाही. मात्र शिक्षण संचालनालयाने २२ मे रोजी दुपारी ३ वाजता पहिल्या फेरीसाठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक दुपारी ३ वाजल्यापासून अर्ज भरण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र संकेतस्थळ सुरूच होत नसल्याने त्यांना अर्ज भरणे शक्य झाले नाही. अखेर शिक्षण संचालनायालने अर्ज भरण्यास २६ मे रोजी सुरूवात होणार असल्याचे स्पष्ट केल्याने विद्यार्थी व पालकांचा जीव भांड्यात पडला.

Back to top button
error: Content is protected !!