मुख्यमंत्री ज्याला योग्य समजतील, तोच चेअरमन होईल’; विखे पाटलांनी स्पष्ट केली भूमिका

अहिल्यानगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदासाठी सुरू असलेल्या चर्चेला आता राजकीय रंग चढू लागला असतानाच, या पदासाठी चर्चेत असलेले विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मुख्यमंत्री महोदय ज्याला योग्य समजतील, तोच व्यक्ती जिल्हा बँकेचा चेअरमन होईल,’ असे स्पष्ट करत त्यांनी चेअरमनपदासाठी स्वतःकडून कोणतेही प्रयत्न अथवा संघर्ष सुरू नसल्याचे सांगितले.
जिल्हा बँकेच्या संदर्भात आपल्या नावाची चर्चा सुरू असल्याचे माझ्याही कानावर येत आहे. मात्र, माझ्या विरोधात कोण आहे, मला कोणाचा त्रास आहे किंवा माझा कोणाला त्रास आहे, याची आपल्याला कल्पना नसल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
‘माझ्या नावावर शिक्कामोर्तब व्हावे यासाठी मी कुठेही धावत नाही. मी कधीही म्हटले आहे का की, मी जिल्हा बँकेचा चेअरमन होणार आहे?’ असा सवालही त्यांनी केला.
चेअरमनपदाबाबत आपली भूमिका कालही स्पष्ट होती आणि आजही तीच असल्याचे सांगत विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या राजकारणात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल. त्यामुळे चेअरमनपदाच्या चर्चेत आपण कोणतीही लॉबिंग अथवा राजकीय मोर्चेबांधणी करीत नसल्याचे त्यांनी सूचित केले.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या पदापेक्षा आपले प्रयत्न सध्या वेगळ्या दिशेने सुरू असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. जागतिक स्तरावर, विशेषतः वर्ल्ड बँकेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते का, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशाच्या तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी राजकीय हालचालींना वेग आलेला असताना विखे पाटील यांनी मात्र निर्णयाची संपूर्ण सूत्रे मुख्यमंत्र्यांच्या हाती असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यांच्या या भूमिकेमुळे जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाच्या चर्चेला नवे राजकीय वळण मिळाले असून, अंतिम निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।






