कोल्हार भगवतीपूरात नवरात्राचा जागर; भाविकांच्या सेवेसोबत दुष्काळग्रस्तांना आधार

भाविकांच्या सुविधांना प्राधान्य; अनावश्यक खर्चाला कात्री, दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
कोल्हार, वार्ताहर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हार भगवतीपूर येथील श्री भगवतीमाता मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दर्शनबारी, स्वच्छता, पिण्याचे पाणी, विद्युत रोषणाई, सुरक्षा, वाहतूक व कचरा व्यवस्थापनाचे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उत्सवात धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकीलाही प्राधान्य देत अनावश्यक खर्चात काटकसर करून बचत होणारी रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवरात्र महोत्सवाच्या नियोजनासाठी देवालय ट्रस्टच्या वतीने बैठक घेण्यात आली. मागील वर्षीच्या नियोजनाचा आढावा घेत यंदाच्या उत्सवाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. नवरात्र काळात सप्तशती माळ, दुर्गा सप्तशती पाठ, पर्जन्य सूक्त पाठ, श्री स्वामी समर्थ जप, नवाण मंत्रजप व महामृत्युंजय मंत्रजप आदी धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत सामुदायिक धार्मिक सेवांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दोन हजार कचरा पेट्यांचे वाटप
नवरात्र काळात वाढणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. देवालय ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायतीला तब्बल दोन हजार कचरा पेट्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी भाविक व ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. मंदिर परिसरासह रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी
नवरात्र महोत्सवाच्या खर्चाचा आढावा घेताना अनावश्यक खर्च टाळण्यावर बैठकीत भर देण्यात आला. उत्सवातील खर्चात काटकसर करून उपलब्ध होणारी रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्याची भूमिका मांडण्यात आली. त्यामुळे धार्मिक उत्सवाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळणार आहे.
दसरा सीमोल्लंघनाने सांगता
नवरात्र महोत्सवाची परंपरेनुसार दसरा सीमोल्लंघन कार्यक्रमाने सांगता होणार आहे. भाविकांना सुलभ व शिस्तबद्ध दर्शन मिळावे, गर्दीचे नियोजन सुरळीत व्हावे आणि संपूर्ण उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडावा, यासाठी देवालय ट्रस्ट व ग्रामस्थांनी व्यापक नियोजन केले आहे.
सन २०१९ पासून देवालय ट्रस्ट व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक धार्मिक सेवेचे आयोजन सातत्याने केले जात आहे. अहिल्यानगरसह विविध जिल्ह्यांतील महिला भाविक या उपक्रमात सहभागी होतात. यंदाही महिला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक सेवा अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीस देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, डॉ. भास्कर खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, ॲड. उदय खर्डे, रावसाहेब खर्डे, पंढरीनाथ खर्डे, उद्धव देवकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्यामराव गोसावी, ॲड. संदीप खर्डे, विजय निबे, राजेंद्र राऊत, प्रवीण बेंद्रे यांच्यासह देवालय ट्रस्टचे विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।







