A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

चंद्रपूर शहरातील वन्यजीव बचाव केंद्र आणि व्याघ्र सफारीच्या कामास गती द्या – वन मंत्री गणेश नाईक


सुमिता शर्मा :
पर्यटन विकास होऊन शहराचे महत्त्व वाढावे, त्याचबरोबर रोजगार निर्मिती व्हावी यासाठी चंद्रपूर शहरात वन्यजीव बचाव केंद्र आणि व्याघ्र सफारीच्या निर्मिती कामाला वेग द्यावा. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

चंद्रपूर येथे वन्यजीव बचाव केंद्र आणि व्याघ्र सफारीच्या निर्मिती संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवर यांच्या विनंतीनुसार आयोजित या बैठकीस वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, प्रधान वन संरक्षक नरेश झिरमुरे, वन विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बाला, उपसचिव विवेक होशिंग, उदय ढगे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. नाईक म्हणाले की, चंद्रपूरमध्ये वन संपदा मोठ्या प्रमाणात असून वाघांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या शहरात पर्यटन वाढून शहराचे महत्त्व वाढण्यासाठी वन्यजीव बचाव केंद्र आणि व्याघ्र सफारी प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या भागातील मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी या केंद्राचा उपयोग करण्यात यावा. त्यामुळे हा प्रकल्प येत्या तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. तसेच या सफारी मध्ये बांबू झाडाची लागवड करावी. या प्रकल्पासाठी वन विभागाच्या निधी बरोबरच जिल्हा गौण खनिज निधी व सामाजिक उत्तरदायित्व निधीचाही वापर करावा.

आमदार श्री. जोरगेवर यांनी वन्यजीव बचाव केंद्र आणि व्याघ्र सफारी प्रकल्पासाठी निधी देण्याची मागणी केली. तसेच या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली.

Back to top button
error: Content is protected !!