
जामखेड शहरातील कायदा व सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण करणारी घटना बुधवारी मध्यरात्री बीड रोडवरील हॉटेल कावेरी येथे घडली. या गोळीबार प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून एक आरोपी अटक करण्यात आला आहे.
या गोळीबारात रोहित अनिल पवार (हॉटेल कावेरी) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींमध्ये
– शुभम लोखंडे (रा. आष्टी),
– उल्हास माने (रा. जांबवाडी),
– अक्षय उर्फ चिंग्या मोरे (रा. भवारवाडी),
– अरशद सैयद (रा. कडा)
यांच्यासह अन्य आरोपींचा समावेश आहे.
जामखेड शहरात सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, हॉटेल परिसरात गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांवर कठोर व कायमस्वरूपी कारवाई करण्याची जोरदार मागणी जामखेड पोलीस प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.




