बिल्डिंग प्रवरा’तून आत्मनिर्भरतेचा जागर; विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनाला विखे पाटलांची दाद

ना. राधाकृष्ण विखे पाटील; ‘बिल्डिंग प्रवरा’त १७५ स्टॉल्समधून विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेचे दर्शन
लोणी,प्रतिनिधी :विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नवनवीन संकल्पना, उत्पादने आणि व्यवसाय उभारून संधी निर्माण करणारी पिढी बनावे, या उद्देशाने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला ‘बिल्डिंग प्रवरा’ बिझनेस एक्स्पो विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा असून, अशा उपक्रमांतूनच विकसित भारताची पायाभरणी होणार आहे, असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी ‘बिल्डिंग प्रवरा’ संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बिझनेस एक्स्पोला ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१७५ स्टॉल्समध्ये कल्पकतेचा बाजार
बिझनेस एक्स्पोमध्ये सुमारे १७५ स्टॉल्स उभारण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण उत्पादने व संकल्पनांचे प्रदर्शन तसेच विक्री केली. सौरऊर्जेवर आधारित उपकरणे, स्वदेशी उत्पादने, अन्नतंत्रज्ञान, सेंद्रिय वस्तू, इलेक्ट्रॉनिक साहित्य, खाद्यपदार्थ, हस्तकला, सजावटीच्या वस्तू यामुळे एक्स्पोला व्यावसायिक रूप प्राप्त झाले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पणत्या, रांगोळी, कपडे, सजावटीचे साहित्य, सेंद्रिय उदबत्ती-धूप, घरगुती उत्पादने आणि विविध खाद्यपदार्थांनी स्टॉल्स सजले आहेत. कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी फळभाज्या, फुलझाडे व विविध रोपांची विक्री केली. सेंद्रिय गूळ, गावरान तूप आणि दूध उत्पादनासाठी उपयुक्त खाद्यपदार्थांनाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद
ना. विखे पाटील यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उत्पादनामागील संकल्पना, बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांची गरज, विक्रीचे नियोजन आणि भविष्यातील व्यवसायाच्या संधी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. काही स्टॉलवरील उत्पादनांची त्यांनी स्वतः खरेदीही केली.
“आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची दिशा या एक्स्पोमधून प्रत्यक्ष दिसत आहे. विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या व्यवसाय संकल्पना भविष्यातील उद्योजकतेची नांदी ठरतील,” असे ना. विखे पाटील यांनी सांगितले.
या वेळी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, नंदूशेठ राठी, सुनील जाधव, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, डॉ. प्रदीप दिघे, सौ. लिलावती सरोदे, डॉ. उत्तमराव कदम, डॉ. महेश खर्डे, डॉ. आर. ए. पवार आदी उपस्थित होते.
‘विकसित प्रवरा’चा संदेश
एक्स्पोच्या प्रवेशद्वारावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जीवनपट साकारण्यात आला असून, हा देखावा आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेवर आधारित ‘विकसित प्रवरा’ हा देखावाही अभ्यागतांचे लक्ष वेधून घेत आहे.
रविवारपर्यंत सुरू राहणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी केले.
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।







