लोहार समाजाच्या ३२ मागण्यांना मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन

२१ वर्षांनंतर मंत्रालयात पुन्हा शिष्टमंडळाची भेट; १२ ते १४ प्रमुख मागण्या लवकरच मान्य करण्याचे संकेत
श्रीरामपूर प्रतिनिधी : लोहार समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नांसह तब्बल ३२ प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सहा सदस्यीय शिष्टमंडळाने दि. २९ सप्टेंबर रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या मागण्यांचे निवेदन बारकाईने वाचून त्यातील १२ ते १४ प्रमुख मागण्या शासनस्तरावर लवकरच मान्य करण्याचे सकारात्मक संकेत दिल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे तसेच जामनेर येथील लोहार समाज व ज्येष्ठ समाजसेवक श्रीकृष्ण चंदनपाट यांच्या सहकार्याने ही बैठक घडून आली. तब्बल २१ वर्षांनंतर मंत्रालयात लोहार समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत दुसरी महत्त्वपूर्ण भेट झाल्याने समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कॅबिनेट बैठकीनंतर मंत्रालयातील विशेष सभागृहात झालेल्या सुमारे २० ते २५ मिनिटांच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी समितीने सादर केलेल्या ३२ मागण्यांच्या निवेदनाची माहिती घेतली. लोहार समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी लोहार समाज आर्थिक विकास महामंडळ लवकरच कार्यान्वित करण्यासह निधीवाढ व प्रतिनिधी नियुक्तीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समितीने सांगितले.
समाजाच्या ३२ मागण्यांपैकी १२ ते १४ प्रमुख मागण्यांवर शासन सकारात्मक असून, याबाबत एक-दोन दिवसांत समितीला अधिकृत लेखी पत्र देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती देण्यात आली. गरज भासल्यास या मागण्यांबाबत माध्यमांसमोर शासनाची भूमिका स्पष्ट करण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी दर्शविल्याचे समितीने म्हटले आहे.
या बैठकीमुळे लोहार समाजाच्या प्रदीर्घ संघर्षाला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी राज्यस्तरावर सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आगामी काळात मागण्यांची अंमलबजावणी होण्याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.
बैठकीप्रसंगी समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्माननीय मफलर व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शिष्टमंडळात सहभागी
दिलीप रामचंद्र वसव, ॲड. युवराज जाधव, ललित सपकाळ, श्रीकृष्ण चंदनपाट, अंकुश थोरात आणि विनायक हरळ यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।






