प्रवरेच्या मैदानावर राष्ट्रीय क्रीडा थरार! देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांचे संघ आमनेसामने

लोणी, दि. २ : वैद्यकीय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रवरा अभिमत विद्यापीठ, लोणी येथे वैद्यकीय महाविद्यालयांच्या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि पॉवरलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांचा थरार पाहायला मिळणार आहे.
प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन प्रवरा अभिमत विद्यापीठाचे विश्वस्त ध्रुव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, विविध राज्यांतील वैद्यकीय महाविद्यालयांचे संघ लोणीच्या क्रीडांगणावर दाखल होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सरस्वती हॉल येथे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते होणार आहे.
प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील अध्यक्षस्थानी राहणार असून, कुलगुरू डॉ.
व्ही. एन.
मगरे आणि अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कर्नाटक, राजस्थान आणि गुजरात या राज्यांसह बेळगाव, बडोदा, कोल्हापूर, सांगली, कराड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जळगाव, अहिल्यानगर आणि मुंबई येथील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे प्रवरेच्या क्रीडांगणावर विविध राज्यांतील खेळाडूंच्या कौशल्याची चुरस पाहायला मिळणार आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसोबतच शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना आणि नेतृत्वगुणांना चालना देण्याच्या दृष्टीने या स्पर्धांना विशेष महत्त्व आहे. तीन दिवसांच्या या राष्ट्रीय क्रीडा महोत्सवामुळे प्रवरा परिसरात क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या खेळाचा थरार अनुभवण्याची संधी स्थानिकांना मिळणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ प्रशासन आणि क्रीडा विभागाने सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती क्रीडा संचालक डॉ. सुनील बुलार यांनी दिली.
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।






