कोपरगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा पाणी, पशुधन, पीकपाणी व प्रलंबित कामांवर तातडीने उपाययोजनांचे निर्देश

कोपरगाव, : कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ टंचाई आढावा बैठक झाली. आमदार विवेक कोल्हे यांनी तालुक्यातील विविध प्रश्न मांडत शेतकरी व नागरिकांच्या अडचणींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
यावेळी विखे पाटील यांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. बैठकीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देतानाच शेतीसाठी पाण्याचे नियोजन, पशुधनासाठी चारा व पाण्याची व्यवस्था, जलजीवन मिशनची प्रलंबित कामे, पाणीपट्टी, वीज, पीक पाहणी, कर्जमाफी, रोजगार हमी योजना आणि विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
आमदार विवेक कोल्हे यांनी पशुधनासाठी चाऱ्याची गरज असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रलंबित कामे निधीअभावी रखडू नयेत, अशी मागणी केली. खरिपातील २६ आणि रब्बीतील ६३ गावांना नियोजनानुसार पाणी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
उजवा व डावा कालव्याचे पाणी वाढविण्यासाठी निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी मंजूर असलेला निधी तातडीने खर्च करून कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाणीपट्टीवरील स्थानिक कर माफ करावा तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित वीज प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. फळबागायतदारांच्या अडचणी, फळबाग पीकविमा, कर्जमाफी आणि रोजगार हमी योजनेची कामे यावरही चर्चा झाली.
मंडळनिहाय हवामान केंद्रांऐवजी गावनिहाय हवामान केंद्रे उभारल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल, अशी भूमिका मांडण्यात आली. निळवंडे धरणातून कोपरगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणीही करण्यात आली.
नगराध्यक्ष पराग संधान यांनी नगरपालिका पाणीपट्टी थकीत असलेल्या नागरिकांना केवळ मूळ रक्कम भरून दंड व व्याज माफ करण्याची मागणी केली. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
बैठकीस आमदार आशुतोष काळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, नगराध्यक्ष पराग संधान, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, तहसीलदार महेश सावंत, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।







