
वडगावशेरी जुलूस अपघात प्रकरणी चंदननगर पोलिसांची कारवाई!*
- पुणे – हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त वडगाव शेरी येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ट्रॅक्टरवर उभे राहून झेंडा फिरवत असताना झेंडयाच्या स्टिलच्या रॉडचा स्पर्श वरुन जाणार्या हाय टेन्शन वायरला झाला. त्यामुळे वीजेचा धक्का बसून जाकीरिया बिलाल शेख (वय २०, रा़. वडगाव शेरी) व अभय अमोल वाघमारे (वय १७, रा. वाडेश्वरनगर, वडगाव शेरी) यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी मिम बॉईज यंग फ्रेन्ड सर्कलचे अध्यक्ष हुसेन कादर शेख (वय ३५, रा. वडगाव शेरी), ट्रॅक्टर चालक विकास अच्युत कांबळे (वय ३२, रा. वाघोली), साऊंड सिस्टीमचे चालक अक्षय बापू लावंड (वय २८, रा. चंदननगर), एलएडी स्क्रीन लावणारे संतोष धावजी दाते (वय ३६, रा. राजगुरुनगर, खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहंमद पैगंबर जयंतीनिमित्त वडगावशेरी येथील मिम बॉईज यंग फ्रेन्ड सर्कल यांनी रविवारी मिरवणुकीचे नियोजन केले होते. अध्यक्ष हुसेन शेख यांनी पोलिसांनी दिलेल्या शर्ती व अटीचे सूचनांचे पालन न करता त्याकडे दुर्लक्ष करुन मिरवणुकीत झेंडे व स्टीलचे पाईप उपलब्ध करुन दिले. विकास कांबळे याने ट्रॅक्टर ट्रॉलीचे फाळके काढून विना परवाना लाकडी स्टेज टाकला. अक्षय लावंड याने साऊंड सिस्टिम लावून एकावर एक साऊंड रचून मर्यादापेक्षा उंची निर्माण केली. तसेच संतोष दाते याने ट्रॅक्टरवर लोखंडी फ्रेम लावून एलएडी स्क्रीन लावून त्याची मर्यादेपेक्षा अधिक उंची निर्माण केली. त्यामुळे अभय वाघमारे हा लोखंडी फ्रेमवर चढून हातात स्टीलचा पाईप असलेला झेंडा फिरवत होता. त्यावेळी त्याच्या उंचीवर असलेली महावितरणची उच्च दाब वीज वाहिनीला स्टील पाईपचा स्पर्श झाला. त्यामुळे वीजेचा धक्का बसून त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला. त्याच्या सोबत असणारा जाकीरिया शेख यालाही वीजेचा धक्का बसून त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोषी जबाबदार चौघांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. या घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून दोघांच्या मृत्यूचा सखोल तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. डीजे साऊंड सिस्टिम वापरताना मंडळाकडून नियमांचे करण्यात येणारे उल्लंघन तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान लक्षात घेता यापुढील काळात बेकायदेशीर डिजे साऊंड सिस्टिम संदर्भात विशेष नियमावली तयार करण्यात येणार असून अशा दुर्दैवी घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. जुलूस मिरवणुकीत दोन तरुणांचा झालेला दुर्दैवी अंत या घटनेची समाज माध्यमांसह समाजातील विविध जागृत घटकांनी नोंद घेऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने अधिक तपास करीत आहेत.





