चंद्रपूर-बल्लारशाह दरम्यान रेल्वेच्या दरवाज्यात बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल काठीने पाडून लंपास करणारा 19 वर्षीय तरुण जेरबंद; 14 मोबाईल जप्त

*चंद्रपूर:* धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात बसून मोबाईल वापरणाऱ्या प्रवाशांच्या हातावर काठीने वार करून मोबाईल खाली पाडून चोरी करणाऱ्या एका तरुणाला रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने रंगेहात पकडले. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे 14 अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त मोबाईलची अंदाजे किंमत 1 लाख 90 हजार रुपये आहे.
*अशी रचला होता सापळा*
दि. 06/07/2026 रोजी सायंकाळी 4.00 वाजण्याच्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पो.शि./571 अखिलेश चौधरी नेम. रे.पो.स्टे. वर्धा, पो.शि./612 निलेश निकोडे नेम. स्था.गु.शा. लोहमार्ग नागपूर, आरपीएफ चंद्रपूरचे SI नितीन अवसरमल आणि आरक्षक सुमित जांगडा यांनी चंद्रपूर ते बल्लारशाह दरम्यान चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनी परिसरात सापळा रचला होता.
यावेळी महाकाली कॉलनी नाल्याजवळील रेल्वे रूळावर _विष्णु उर्फ चुआ S/O राजविर केम, वय 19 वर्ष, रा. आदर्श केंद्रीय निवासी शाळा, विसापूर ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर, सध्या मुक्काम – महाकाली कॉलनी, आनंदनगर, चंद्रपूर_ हा धावत्या गाड्यांच्या दरवाज्यात मोबाईल बघत बसलेल्या प्रवाशांच्या हातावर काठीने फटका मारून मोबाईल खाली पाडण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
*3-4 महिन्यांपासून करत होता चोरी*
तपासादरम्यान त्याच्याकडून 14 अँड्रॉइड मोबाईल मिळून आले. त्यांच्याबाबत बिल किंवा पावती मागितली असता त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगितले. चौकशीत त्याने मागील 3-4 महिन्यांपासून वेगवेगळ्या धावत्या रेल्वेगाड्यांच्या दरवाज्यात हातात मोबाईल घेऊन बसलेल्या प्रवाशांच्या हातावर काठीने मारून मोबाईल खाली पाडून ते उचलल्याची कबुली दिली.
दि. 07/07/2026 रोजी त्याला 14 मोबाईलसह रेल्वे पोलीस चौकी बल्लारशाह येथे हजर करण्यात आले. तेथील पदवीधर तपासी अधिकारी पोशि/449 राजेश ठाकरे यांनी e-saksh प्रणालीद्वारे दोन पंचासमक्ष पंचनामा करून मोबाईल जप्त केले. त्याच्याविरुद्ध _रे.पो.स्टे. वर्धा येथे कलम 124 म.पो.का. अन्वये अदखलपात्र गुन्हा_ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा/228 जयकांत गायकवाड नेम. रे.पो.स्टे. वर्धा हे करीत आहेत.
*वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाई*
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपूर डॉ. मंगेश शिंदे यांच्या आदेशान्वये, मा. दत्ताराम राठोड, अपर पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर, मा. PI पंजाबराव डोळे, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर आणि मा. PI विरसेन चहांदे, प्रभारी अधिकारी, रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा यांच्या मार्गदर्शनात DB पथकाने संयुक्तपणे केली.
*रेल्वे पोलिसांचे प्रवाशांना आवाहन*
रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांनी दरवाजात बसून मोबाईल वापरू नये, अन्यथा अशा चोरट्यांना संधी मिळते. त्यामुळे प्रवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।







