Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Nanded

*चढ-उतार : एका आयुष्याची कहाणी*

23 Oct 2026, 10:41 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
*चढ-उतार : एका आयुष्याची कहाणी* - नांदेड, महाराष्ट्र

*चढ-उतार : एका आयुष्याची कहाणी*

*-धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर*

*प्रकरण १६ : नव्या वाटेचा अनपेक्षित आरंभ*

आमदार प्रकाशभाऊंच्या निधनाचा आघात इतका मोठा होता की माझे मन त्यातून बाहेर पडायलाच तयार नव्हते. सतत विचार करत राहिल्यामुळे माझी मानसिक अवस्था आणखी बिघडत चालली होती. भविष्याची चिंता, प्रकाशभाऊंच्या जाण्याचे दुःख आणि आयुष्यात अचानक निर्माण झालेली पोकळी या सगळ्यांनी माझ्या मनाचा ताबाच घेतला होता. वैद्यकीय उपचार सुरू होते; पण अपेक्षित फरक पडत नव्हता.

माझी अवस्था पाहून घरचेही खूप चिंतेत होते. शेवटी त्यांनी देवधर्माचा आधार घ्यायला सुरुवात केली. नवस, पूजा-अर्चा सुरू झाली. दर महिन्याच्या प्रदोषला औंढा नागनाथच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा क्रम सुरू झाला. मनाला कुठेतरी आधार मिळावा, हीच त्यामागची भावना होती.

माझी अवस्था मात्र अजूनही विचित्र होती. चालता चालता अचानक चक्कर यायची आणि मी बेशुद्ध होऊन खाली पडायचो. त्यानंतर किती वेळाने शुद्धीवर आलो, हेही मला कळत नसे. कधी कुठे पडलो, कोणीतरी मला उचलले की रुग्णालयात नेले, याचीही नीट आठवण राहत नसे. या सगळ्याचा सर्वाधिक त्रास माझ्या कुटुंबीयांना सहन करावा लागत होता.

अशाच काळात छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. पानसरे नांदेडला भेटीसाठी आले. घरच्यांनी मला त्यांच्याकडे दाखवले. माझी अवस्था समजून घेतल्यानंतर त्यांनी पुढील उपचारांसाठी संभाजीनगरला येण्याचा सल्ला दिला.

मी संभाजीनगरला गेलो. डॉक्टरांनी माझ्याशी जवळजवळ तीन तास सविस्तर संवाद साधला. आयुष्यात आजपर्यंत कोणत्या प्रसंगांनी मला अस्वस्थ केले, अगदी छोट्या कारणानेसुद्धा मी कधी अस्वस्थ झालो होतो का, कोणत्या घटनांचा माझ्या मनावर परिणाम झाला, अशा अनेक गोष्टी त्यांनी बारकाईने जाणून घेतल्या. माझ्या आयुष्याचा जणू एक मानसिक पटच त्यांनी माझ्याकडून उलगडून घेतला.

ती सखोल चर्चा झाल्यानंतर त्यांनी काही औषधे सुरू केली. या उपचारांचा चांगला परिणाम दिसू लागला. हळूहळू माझी अवस्था सुधारू लागली आणि साधारण महिन्याभरात मी पुन्हा पूर्वीसारखा तंदुरुस्त झालो. पाच महिन्यांच्या त्या मानसिक आजारपणातून बाहेर पडताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—माणसाच्या शरीरावर झालेल्या जखमा दिसतात; पण मनावर झालेल्या जखमा दिसत नाहीत. त्या बऱ्या होण्यासाठी वेळ, उपचार आणि आपल्या माणसांचा आधार तितकाच आवश्यक असतो.

दरम्यान, प्रकाशभाऊ खेडकर यांच्या निधनामुळे नांदेडची विधानसभा जागा रिक्त झाली होती. उर्वरित कार्यकाळ सहा महिन्यांपेक्षा अधिक असेल, तर पोटनिवडणूक घेण्याचा नियम असल्याने त्याबाबत शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या. मात्र, निवडून येणाऱ्या आमदाराला उर्वरित कार्यकाळ एक वर्षापेक्षाही कमी मिळणार होता. त्यामुळे पोटनिवडणूक झाली नाही तर बरे होईल, असा विचार मनात आला.

महाराष्ट्र निवडणूक आयोगात नांदेडचे एक अधिकारी काम करत होते. प्रकाशभाऊंशीही त्यांचे सलोख्याचे संबंध होते आणि माझीही त्यांच्याशी चांगली ओळख होती. मुंबईला जाऊन मी त्यांच्याशी परिस्थितीबाबत चर्चा केली. प्रकाशभाऊंच्या निधनानंतरची नांदेडची भावनिक आणि राजकीय परिस्थिती त्यांनाही माहीत होती. अखेरीस प्रकाशभाऊंबद्दलच्या आपुलकीपोटी पोटनिवडणूक टाळण्याच्या दृष्टीने परिस्थिती अनुकूल राहिली.

आता माझ्यासमोर मात्र दुसरा प्रश्न उभा राहिला होता. एस.टी.च्या नोकरीचा राजीनामा मी आधीच दिला होता. प्रकाशभाऊंचे सिंहगड कार्यालयही बंद झाले होते. त्यामुळे माझ्याकडे भरपूर मोकळा वेळ होता. त्याचबरोबर आर्थिक अडचणीही सुरू झाल्या होत्या. दिवसभर काय करायचे, हा प्रश्न पडू लागला. काहीतरी नवीन करावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, असा विचार मनात घोळत होता; पण काय करायचे, याचे उत्तर मिळत नव्हते.

आणि याच विचारातून एका नव्या प्रवासाची बीजे रोवली गेली—‘भाऊ ट्रॅव्हल्स’ची.

यामागे एक जुना अनुभव होता.

नांदेडमधील एक व्यक्ती दरवर्षी भाविकांना अमरनाथ यात्रेला घेऊन जात असे. दोन वर्षांपूर्वी त्या ग्रुपसोबत मी, मोरे काका, रमेश डागा, सुभाष गादेवार,गोविंद माळवतकर आणि मनोज भंडारी अमरनाथला गेलो होतो. त्या यात्रेत आम्ही खूप आनंद घेतला होता. प्रवासात आम्ही सर्वांशी मिळून-मिसळून राहत होतो. टूर आयोजक मात्र अतिशय शिस्तप्रिय आणि काहीसे कडक होते. आमचा स्वभाव मात्र मोकळा. त्यामुळे आमच्याभोवती इतरांपेक्षा जास्त लोक गप्पा मारत बसायचे.

त्याच वेळी आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा अमरनाथला येण्याचे ठरवले होते आणि तशी कल्पना आयोजकांनाही दिली होती.

पुढील वर्षी यात्रेची तयारी सुरू झाल्यावर आम्ही त्या आयोजकांशी संपर्क साधला. त्यांनी मात्र सांगितले, “आमचे बुकिंग पूर्ण झाले आहे.”

आम्हाला आश्चर्य वाटले. आम्ही त्यांना सांगितले, “गेल्याच वर्षी आम्ही पुढच्या वर्षी येणार असल्याचे सांगितले होते. मग आम्हाला आधी का सांगितले नाही?”

पण त्यांचे उत्तर स्पष्ट होते—“ग्रुप आधीच फुल झाला आहे.”

क्षणभर आम्हाला वाईट वाटले. पण त्याच वेळी माझ्या मनात एक वेगळाच विचार चमकून गेला—आपणच का टूर आयोजित करू नये?

गेल्या वर्षीचा अनुभव आमच्याकडे होता. अमरनाथ यात्रेतील अडचणी, प्रवासाचे नियोजन, मुक्काम, जेवण, भाविकांची काळजी आणि वेळेचे नियोजन—या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला होता. नगरसेवक दीपकसिंह रावत यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यांनाही ही कल्पना आवडली.

बघता बघता आमचा ग्रुप ७०-८० जणांचा झाला. आम्ही अमरनाथ यात्रेला निघालो. प्रवास अत्यंत चांगला झाला. भाविक आनंदात होते. व्यवस्था व्यवस्थित झाली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होते.

परतीच्या प्रवासात मनमाड येथे एक मजेदार प्रसंग घडला. आमची आणि नांदेडमधील त्या जुन्या टूर आयोजकांच्या ग्रुपची एकाच रेल्वेत भेट झाली. आमच्या ग्रुपमध्ये गप्पा, हशा, विनोद आणि उत्साहाचे वातावरण होते. त्यांचा ग्रुप मात्र तुलनेने शांत आणि गंभीर होता.

आमच्या ग्रुपचा उत्साह पाहून त्यांच्या ग्रुपमधील काही लोकांनी त्या टूर मॅनेजरला अक्षरशः धारेवर धरले. “यांचा ग्रुप किती आनंदात आहे, किती चांगली व्यवस्था आहे; मग आमच्यासोबत असे का झाले?” असे प्रश्न ते विचारू लागले.

तो प्रसंग माझ्या मनात कायमचा कोरला गेला होता . लोकांना चांगली व्यवस्था, आपुलकीचा व्यवहार आणि आनंदी वातावरण मिळाले, तर ते पुन्हा आपल्यासोबत प्रवास करतील, असा विश्वास त्या दिवशी मनात निर्माण झाला होता.

मग निर्णय झाला.

मोरे काकांच्या निधनाने मनावर खोल जखम झाली होती. त्यांचा मुलगा राजू मोरे याला मी या नव्या उपक्रमात सोबत घेतले. आम्ही ‘भाऊ ट्रॅव्हल्स’ची तयारी सुरू केली.

हा व्यवसाय चालेल की बंद पडेल, याचा फारसा विचार केला नाही. मोठे भांडवल नव्हते, व्यवसायाचा अनुभव नव्हता आणि पुढे किती अडचणी येतील, याची कल्पनाही नव्हती. पण एक विश्वास होता—लोकांना आपले मानून प्रवास घडवला, तर आपली माणसे आपल्यासोबत नक्की उभी राहतील.

प्रकाशभाऊंच्या जाण्याने आयुष्य एका मोठ्या वळणावर आले होते. त्याच दुःखातून बाहेर पडत असताना ‘भाऊ ट्रॅव्हल्स’च्या रूपाने एक नवी वाट समोर आली होती. ही वाट आपल्याला कुठे घेऊन जाईल, याचा अंदाज नव्हता.

पण एक गोष्ट मात्र निश्चित होती—प्रकाशभाऊंच्या जाण्याने माझ्या आयुष्यात एक अध्याय संपला होता आणि नकळत दुसरा अध्याय सुरू झाला होता.

त्या नव्या अध्यायाची पहिली परीक्षा काय असणार होती, हे मात्र काळाच्या पोटात दडलेले होते…

(क्रमशः)
———
मागील भाग वाचायचे असतील तर
94218 39333 वर व्हाट्सअप करा 🙏
[23/10, 18:42] devashishtokekar05: **All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

अंतरराष्ट्रीय मंच पर चमके बिजनौर के शाश्वत धीमान, उत्कृष्ट प्रबंधन के लिए मिला ‘ग्लोबल सस्टेनेबिलिटी अवार्ड
Bijnor23 Oct

अंतरराष्ट्रीय मंच पर चमके बिजनौर के शाश्वत धीमान, उत्कृष्ट प्रबंधन के लिए मिला ‘ग्लोबल सस्टेनेबिलिटी अवार्ड

बिजनौर : दिल्ली विश्वविद्यालय के मिरांडा हाउस कॉलेज में आयोजितl एक भव्य अंतरराष्ट्रीय समारोह में बिजनौर के शाश्वत…

पूरी खबर पढ़ें →
अंतरराष्ट्रीय मंच पर चमके बिजनौर के शाश्वत धीमान, उत्कृष्ट प्रबंधन के लिए मिला ‘ग्लोबल सस्टेनेबिलिटी अवार्ड
Bijnor23 Oct

अंतरराष्ट्रीय मंच पर चमके बिजनौर के शाश्वत धीमान, उत्कृष्ट प्रबंधन के लिए मिला ‘ग्लोबल सस्टेनेबिलिटी अवार्ड

बिजनौर : दिल्ली विश्वविद्यालय के मिरांडा हाउस कॉलेज में आयोजितl एक भव्य अंतरराष्ट्रीय समारोह में बिजनौर के शाश्वत…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!