गडचिरोलीतील मार्कंडा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची ‘बत्ती गुल’; ७ महिन्यांपासून वीजबिल थकल्याने महावितरणने कापले कनेक्शन

समीर वानखेडे, ब्युरो चीफ:
गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाचा भोंगळ कारभार आणि प्रशासकीय निष्काळजीपणाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील मार्कंडा वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) कार्यालयाचे वीजबिल गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून भरले नसल्याने महावितरणने (MSEDCL) कठोर पाऊल उचलत कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. अवघ्या ९,००० रुपयांची थकबाकी न भरल्यामुळे संपूर्ण कार्यालय अंधारात बुडाले आहे.
नियमित सरकारी निधी असूनही बिल थकीत का?
विभागीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणने गेल्या ६-७ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या सुमारे ९ हजार रुपयांच्या वीजबिलाचा भरणा करण्यासाठी अनेकदा प्रतीक्षा केली, मात्र रक्कम जमा करण्यात आली नाही. अखेर नाईलाजाने महावितरणला कार्यालयाचे वीज कनेक्शन कापावे लागले.
या प्रकारामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शासन आणि वरिष्ठ कार्यालयाकडून कार्यालयीन खर्चासाठी नियमितपणे निधी वितरित केला जात असतानाही ७ महिन्यांपर्यंत बिल थकीत कसे राहिले? येणारा सरकारी निधी नेमका जातो कुठे, असा सवाल आता विचारला जात आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे संगणक प्रणाली, कागदपत्रांची कामे आणि दैनंदिन शासकीय कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून, सामान्य नागरिक व वन कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जंगल परिसरात वन्यजीवांच्या हल्ल्याची भीती
मार्कंडा वनपरिक्षेत्र कार्यालय हे घनदाट जंगल परिसरात वसलेले आहे. अशा संवेदनशील भागात रात्रीच्या वेळी वीज नसल्याने कार्यालय परिसर आणि आजूबाजूला दाट अंधार पसरलेला असतो. परिणामी, तेथे कर्तव्यावर असलेले कर्मचारी आणि वनरक्षकांवर विषारी जीवजंतू तसेच हिंसक वन्यजीवांच्या हल्ल्याची गंभीर भीती निर्माण झाली आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
प्रशासकीय वर्तुळात आणि स्थानिक पातळीवर या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची अशी कोणती मजबुरी होती की त्यांनी ६-७ महिन्यांपर्यंत वीजबिलाचा भरणा केला नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून थकीत निधीच्या वापराचा हिशोब घ्यावा, तात्काळ वीजपुरवठा पूर्ववत करावा आणि दोषी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।







