
प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्यसचिव .
पुणे, मांजरी :
मांजरी परिसरातील शिंगोटे पार्क सोसायटीमध्ये तब्बल 400 ते 500 कुटुंबं वास्तव्यास असून, लाखो रुपयांचा टॅक्स भरूनही येथील नागरिकांना अद्याप मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.
या सोसायटीमध्ये वीजपुरवठ्याचा मोठा प्रश्न कायम आहे. वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी दाबामुळे अनेकांची इलेक्ट्रॉनिक उपकरणं जळाली आहेत. कुणाचे फ्रीज तर कुणाची पाण्याची मोटर नादुरुस्त झाली असून यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे.
महापालिकेला कर भरूनही कचरा संकलनासाठी नागरिकांना खाजगी ठेकेदारांना दरमहा 90 ते 100 रुपये मोजावे लागतात. यामुळे नागरिकांवर दुहेरी आर्थिक भार येतो.
तसेच, महापालिकेकडून रस्त्यांची सुविधा न दिल्यामुळे नागरिकांनीच लोकवर्गणीतून तीस फुटी सिमेंट रस्ता तयार केला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “जसा आम्ही मतदानाचा हक्क बजावतो, तसाच आम्हाला प्रशासनाने मूलभूत नागरी सुविधा पुरवल्या पाहिजेत. तो आमचा अधिकार आहे.”
स्थानिक आमदार, खासदार, महावितरण तसेच महापालिका प्रशासन यांचे लक्ष शिंगोटे पार्क सोसायटीच्या समस्यांकडे वेधून घेण्यासाठी नागरिकांनी आवाज उठवला आहे. लवकरच या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.