अजितदादांच्या स्मृतिस्थळावर कृतज्ञतेचे दीप उजळणार!

अजितदादांच्या स्मृतिस्थळावर कृतज्ञतेचे दीप उजळणार! पाडव्याच्या मुहूर्तावर बारामतीतील शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम; 'एक दीप कृतज्ञतेचा' उपक्रमातून अभिवादन
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी बारामतीतील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दीपावली पाडव्याच्या निमित्ताने 'एक दीप कृतज्ञतेचा' हा विशेष उपक्रम आयोजित केला आहे.
मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विद्या प्रतिष्ठान येथील अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळावर कृतज्ञतेचे दीप प्रज्वलित करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमासाठी बारामतीसह राज्यातील व देशातील विविध ठिकाणी शासकीय सेवेत कार्यरत असलेले बारामती परिसरातील अधिकारी व कर्मचारी एकत्र येणार आहेत. बारामतीसारख्या ग्रामीण भागातून शासकीय सेवेत दाखल झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यासाठी सुविधा निर्माण करणे तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अजितदादांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या पाठबळामुळे बारामतीतील अनेक युवक-युवतींना वर्ग एक व वर्ग दोनच्या पदांवर शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळाली.
अजितदादांच्या जाण्याने मोठा आधार आणि पाठीराखा हरपल्याची भावना अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये आहे. याच कृतज्ञतेच्या भावनेतून पाडव्याच्या दिवशी त्यांच्या स्मृतिस्थळी जाऊन एक दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्याचा निर्णय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
दिवाळीतील प्रत्येक पाडव्याला अजितदादांची भेट घेण्याची सवय असलेल्या अनेकांसाठी हा दिवस भावनिक ठरणार आहे. आता अजितदादा आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेले पाठबळ कायम स्मरणात राहावे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी बारामती व परिसरातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन 'आपली बारामती, आपली माणसं' या बारामतीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।







