
जामखेड (ता. जामखेड) :
जामखेड शहर व तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात सर्रासपणे वेगवेगळ्या भागांत वेश्याव्यवसाय, गोळीबार, मारहाण, अवैध धंदे, दारू विक्री तसेच बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सर्व प्रकारांना रोखण्यात स्थानिक पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे अनेक अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याची चर्चा शहरात उघडपणे होत आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे त्यांचे मनोबल वाढत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर होत आहे.
शहरातील शांतता भंग पावू नये, महिलांची सुरक्षितता अबाधित राहावी तसेच युवक गुन्हेगारीकडे वळू नयेत यासाठी तातडीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जामखेड शहरातील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जर वेळेत ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अधिकच बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.












