A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

शेतकऱ्यांचे हित सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध – आ सुधीर मुनगंटीवार


सुमिता शर्मा :
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी ठोस पावले उचलण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. शेती ही केवळ व्यवसाय नसून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे साधन आहे, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम तत्पर राहण्याचा विश्वास व्यक्त केला.*

राज्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी पंप, धानाचा बोनस, कर्जमुक्ती, कृषी यांत्रिकीकरण, प्रशिक्षण केंद्रे, कृषी महाविद्यालय आणि कृषी हाट अशा अनेक योजनांद्वारे उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे यावर विशेष भर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात शेती हा केवळ मजबुरीचा व्यवसाय नव्हे, तर आर्थिक स्थैर्य व मजबुती देणारा व्यवसाय व्हावा, यासाठी त्यांच्या समस्यांवर तत्पर उपाययोजना करणे आणि प्रश्न प्राधान्याने सोडविणे हा ठाम निर्धार आहे, अशी ग्वाही आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे कृषी पंप विज जोडणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष बंडू गौरकार, महामंत्री भालचंद्र वडस्कर, महावितरण तज्ञ माधव जीवतोडे, युवा किसान मोर्चाचे अध्यक्ष पलींद्र सातपुते, अनिल मोरे, प्रभाकर ताजणे, विजय गुरनुले, रवींद्र चहारे आदींची उपस्थिती होती.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘आज जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने चर्चिले गेले. मी विधानसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडताना स्पष्ट केले की, कृषी पंप हा चंद्रपूरकरांचा हक्क आहे. विदर्भाचा अनुशेष १ लाख २६ हजारांहून अधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मागेल त्याला कृषी पंप देण्यात आले. विदर्भातील शेतकऱ्यांचे हक्क त्यांना पूर्णपणे दिले जाणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अर्थमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना सुरू केली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा प्रयत्न केला.’

महाराष्ट्राच्या निवडणुकीचा जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीचा मी अध्यक्ष असतांना, आग्रहाने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मुद्दा जाहीरनाम्यात समाविष्ट केला. शेतकऱ्यांच्या आयुष्यात शेती ही मजबुरी नव्हे, तर मजबुतीचा व्यवसाय व्हावा, शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते प्राधान्याने करण्याचा निर्धार आहे. शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी डिमांड भरले असूनही विभागाकडून त्यांचे चेक परत करण्यात येत आहेत. मात्र, हे चेक परत करण्यामागचे कारण महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगता आले नाही. चंद्रपूर जिल्ह्यासाठी 7,000 मेट्रिक टन युरिया खताचे आवंटन करण्यात आले. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात पहिल्यांदाच कोरोमंडल कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करून गुन्हा दाखल केला गेला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कायद्याच्या चौकटीत राहून लढण्याचा ठाम निर्णय केला. पोभुर्णा तालुक्यातील 7 शेतकऱ्यांना राज्य कृषी पुरस्कार प्राप्त झाला असून, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मी सांस्कृतिक कार्यमंत्री असताना चंद्रपूरमध्ये 80 कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांसाठी कृषी हाट करण्यात येत आहे. या हाटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल. मुल येथे कृषी महाविद्यालय उभारण्यात येत असून, पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जात आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढवणे या दोन महत्त्वाच्या उद्दिष्टांवर विशेष काम केले जात आहे. शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळावा यासाठी विधानसभेत आवाज उठवला. सुमारे ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचा बोनस जमा झाला असून, धान चुका-याचे पैसेही दिले गेले. धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री महोदयांशी सकारात्मक चर्चा करण्यात येईल. मतदारसंघातील काही गावे ‘पोखरा’ तर काही गावे ‘किसान समृद्धी’ योजनेत समाविष्ट आहेत. शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, यांत्रिकीकरणाच्या योजना आणि जमिनीची सुपीकता वाढविणाऱ्या योजनांबाबत मतदारसंघातील प्रत्येक गावात जनजागृती करा. मतदारसंघ कृषी क्षेत्रात प्रथम क्रमांकावर राहावे यासाठी सतत कार्य करा. महाराष्ट्रातून ‘पोखरा’ आणि ‘समृद्धी’ योजनेत सर्वात जास्त प्रस्ताव बल्लारपूर मतदारसंघातून जावेत याची दक्षता घ्या. पालकमंत्री असताना ५,००३ किलोमीटरच्या शेतकऱ्यांच्या पानंद रस्त्यांचा निर्णय घेतला.
मतदारसंघातील प्रत्येक गावातील पानंद रस्ते याच ५,००३ किलोमीटरच्या आराखड्यात समाविष्ट आहेत. माविमच्या माध्यमातून महिला बचत गटांचे यांत्रिकीकरण करा आणि पुरुष बचत गट स्थापन करण्यात यावे.
जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा विकास इतका आदर्श असावा की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हणतील, खेती करने का तरीका हो तो बल्लारपूर विधानसभा क्षेत्र जैसा हो. असेही ते आवर्जून म्हणाले. कृषी पंप विज जोडणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली. स्वतःच्या हक्काची जाणीव ठेवून शेतकरी या ठिकाणी सहभागी झाले. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सुटावे यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!