

समीर वानखेडे:
गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राद्वारे करण्यात आलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ काही तासांतच या मदतीला मंजुरी दिली. याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आभार मानले आहेत.*
गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे तिन विद्यार्थी गोपाल गणेश साखरे (बुलढाणा), पार्थ बाळासाहेब जाधव (अहिल्यानगर, शिर्डी) आणि स्वप्निल उद्धवसिंह शिरे (छत्रपती संभाजीनगर) हे तिघे विद्यार्थी १० मे रोजी वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेले असता, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय शिक्षणाच्या प्रारंभीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मदतीची मागणी केली होती. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी काही तासातच प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.
“या दुर्घटनेमुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. समाजसेवेचे स्वप्न बाळगून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केलेल्या या तरुणांचे आयुष्य अचानक संपुष्टात आले. त्यांच्या कुटुंबांना शासनाकडून दिलासा मिळावा, हीच भावना माझी होती. यासाठी केलेल्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्वरित मान्यता दिली, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे,” अशी भावना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.






