A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेमहाराष्ट्रसंगमनेर

दर्जेदार कामासाठी ग्रामशक्तीचा ‘कडक पहारा’ सुरूच – किरण पा.कडु 

सात्रळच्या रस्ता लढ्याला निर्णायक वळण लिखित हमीनंतर उपोषण मागे; दर्जेदार कामासाठी ग्रामस्थ ठाम

लोणी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील सात्रळच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या कामावरून पेटलेला संघर्ष आज निर्णायक टप्प्यावर पोहोचला. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट, सजग नेतृत्व आणि तडजोड न मानणारी भूमिका – या तिन्हींच्या जोरावर आंदोलनकर्त्यांनी शासनाकडून लिखित हमी व तांत्रिक पालनाची सक्ती करून घेतली आहे. उपोषण मागे घेतले असले तरी ग्रामस्थांची भूमिका स्पष्ट आहे—”काम दर्जेदार; नाही तर आंदोलन पुन्हा पेटणार!”

गेल्या दोन दिवसांपासून सात्रळच्या बाजारपेठेत तणाव उसळला होता. रस्त्याच्या गुणवत्तेतील त्रुटी, निकृष्ट साहित्य, ड्रेनेज आराखड्यातील उघड उणीवा यावर ग्रामस्थांनी थेट प्रशासनाला जाब विचारला. कार्यकर्ते किरण कडू यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. “तांत्रिक निकषांचा लेखी पुरावा मिळाल्याशिवाय उठणार नाही” हा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केला आणि त्यालाच प्रशासन नमतं घेतं, अशी वेळ आणली.

ग्रामपंचायत यंत्रणा मध्यस्थीसाठी पुढे आली. सरपंच सतीश ताठे, ग्रामसेवक हैदर पटेल, ज्येष्ठ नेते बाळकृष्ण चोरमुंगे, प्रताप कडू, दिलीप डुक्रे यांनी दीर्घ चर्चा करून “काम पूर्णतः शासकीय दर्ज्याचे, दोन्ही बाजूंना ड्रेनेजसह आणि पारदर्शक प्रक्रियेतच होईल” अशी लिखित हमी देण्यास भाग पाडले. या आश्वासनावर सर्कल अधिकारी खटावकर आणि तलाठी किशोर पवार यांनीही शिक्का मोर्तब केला.

उपोषण उठवल्याची घोषणा करत किरण कडू म्हणाले —“सात्रळची बाजारपेठ ऐतिहासिक आहे. लोकांच्या पैशांचे काम दर्जाहीन होऊ देणार नाही. लोक एकत्र आले तर कोणत्याही सत्तेला गुडघे टेकावे लागतात—आज सात्रळने ते दाखवून दिले.”

निर्णायक क्षणी माजी आमदार प्राजक्तदादा तनपुरे आंदोलनस्थळी आले आणि संपूर्ण परिस्थितीचा वेग बदलून टाकला. त्यांनी प्रशासनाला उघड इशारा दिला —

“जनतेची मागणी ही आदेशासमान आहे. रस्त्याचे काम निकषांनुसारच झाले पाहिजे—नाहीतर जनभावनेचा स्फोट रोखता येणार नाही!”

त्यांच्या हस्तक्षेपानंतर मागण्या तत्काळ मान्य करण्याची गती अधिकाऱ्यांना मिळाली.

या आंदोलनात व्यापारी, युवक, ज्येष्ठ नागरिक ते सामाजिक संघटनांपर्यंत सर्वांनी एकत्रितपणे भूमिका घेतली. हर्षल कडू, दत्तात्रय पलघडमल, उदय कडू, भाऊसाहेब पलघडमल, अझीम तांबोळी, नासिर तांबोळी, सादिकभाई शेख, किशोर भांड यांच्यासह मोठी उपस्थिती पाहून प्रशासनाचे खांदे थरथरले.

तणाव कमी करण्यात नरेंद्र कडू, प्रभाकर पलघडमल, एकनाथ जाधव, पोपट कडू, युसूफ इनामदार यांची समन्वय भूमिका महत्त्वाची ठरली.

गेल्या काही दिवसांत सात्रळ पंचक्रोशीत “रस्ता प्रश्न” आक्रोश बनला होता. गुणवत्तेविरोधातील रोष एवढा प्रखर झाला की अखेर प्रशासनालाच लेखी स्वरूपात जनतेसमोर बांधील राहावे लागले. आंदोलन स्थगित झाले आहे; मात्र लोकशक्तीचा दबाव कायम आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट चेतावणी दिली आहे—

“कामात तडजोड नाही. प्रत्येक घडीला ग्रामपरीवेक्षण सुरूच. गरज पडल्यास लढा पुढे आणखी तीव्र!”

Back to top button
error: Content is protected !!