मानोरा पोलिसांचा दणका! अवघ्या २४ तासांत सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा; पुतण्यालाच अटक! शेतात तुराट्याच्या गंजीजवळ जमिनीत पुरून ठेवले होते चोरीचे दागिने; मानोरा पोलिसां

मानोरा पोलिसांचा दणका! अवघ्या २४ तासांत सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा; पुतण्यालाच अटक!
शेतात तुराट्याच्या गंजीजवळ जमिनीत पुरून ठेवले होते चोरीचे दागिने; मानोरा पोलिसांनी मुद्देमाल केला हस्तगत!
मानोरा : घराला कुलूप लावून शेतात गेलेल्या शेतमजुराच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना मानोरा तालुक्यात उघडकीस आली होती. मात्र, या चोरीच्या गुन्ह्याचा मानोरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात फिर्यादीच्या २२ वर्षीय पुतण्याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले असून, त्याने चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकी घटना काय?
पोलीस स्टेशन मानोरा येथे भास्कर प्रल्हाद मनवर (वय ४५ वर्षे, व्यवसाय शेतमजुरी, रा. हिवरा बु., ता. मानोरा, जि. वाशिम) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांनी घराला कुलूप लावले आणि समोरील खोलीच्या खिडकीत एका डब्यात घराची चावी ठेवून भाजीपाला आणण्यासाठी व कापूस वेचणीसाठी शेतात गेले होते.
सायंकाळी घरी आल्यानंतर घरातील अलमारीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामध्ये चांदीचे पायातील कडे, तोरड्या, हातातील पाटल्या, सौभाग्य पोत, मणी-डोरले पोत, कानातील टॉप्स, सोन्याच्या बाळ्या तसेच चांदीचा हंस अशा एकूण ६४ हजार ९६० रुपये किमतीच्या दागिन्यांचा समावेश होता. याप्रकरणी दि. १२ नोव्हेंबर रोजी मानोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांचा तपास सुरू; पुतण्यावर संशय अन् गुन्ह्याचा उलगडा!
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार पोलीस निरीक्षक नैना पोहेकर व तपास अधिकारी सफौ. साहेबराव राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली. घटनास्थळी वाशिम येथील श्वानपथक, कारंजा येथील फॉरेन्सिक व्हॅन आणि अंगुलीमुद्रा तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
साक्षीदार तसेच परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता फिर्यादीचा पुतण्या विवेक कुमार मनवर (वय २२ वर्षे, रा. हिवरा, ता. मानोरा) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर आरोपीने शेतातील धुऱ्यावर तुराट्याच्या गंजीजवळ जमिनीत पुरून ठेवलेले चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने पंचांसमक्ष काढून दिले. पोलिसांनी सदर मुद्देमाल ताब्यात घेतला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा पोलिसांची कामगिरी
ही उल्लेखनीय कामगिरी वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. निकेश खाटमोडे (पाटील), अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये मानोरा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती नैना पोहेकर, सफौ. साहेबराव राऊत, पोहवा संदीप जाधव, राधेश्याम महल्ले, पोलीस अंमलदार आशिष एकाडे, विजय जाधव, रोहन तायडे व चालक रूपेश नाईक यांनी सहभाग घेतला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सफौ. साहेबराव राऊत करीत आहेत.
अवघ्या २४ तासांत चोरीचा छडा लावत मुद्देमाल हस्तगत केल्याने मानोरा पोलिसांच्या तत्पर तपासाचे कौतुक होत आहे.
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।







