
मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मात्र, भाजपमध्ये प्रवेश केल्यावर आपल्या पहिल्यास भाषणात बोलतांना अशोक चव्हाण अडखळले. तर, भाजप मुंबईचे अध्यक्ष असे उल्लेख करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष इथे उपस्थित असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या फडणवीसांसह सर्वजण खळखळून हसले. पण, आपली चूक लक्षात येताच अशोक चव्हाणांनी सावरासावरी केली.
आम्ही विरोधात आणि सत्तेत असतांना देखील आमचे राजकारणापलिकडे संबंध होते. विकासाची आम्ही नेहमी साथ दिली. राज्यासाठी काम करतांना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. गेल्या 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवी सुरूवात करतोय. विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी सकारात्मक आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेल. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करणार आहे. मी व्यक्तिगत टीका कुणावर करणार नाही. मी कुणावर दोषारोप केलेले नाही आणि करणार नाही. पक्ष प्रवेशाची फी देखील मी बावनकुळे यांना दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास करत आहेत. अशोक चव्हाण म्हणाले.