कल्याण : कल्याण पूर्वेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर गंभीर जखमी झालेले कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील तेरा दिवसांपासून अत्यवस्थ असलेले महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याने डाॅक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढून सामान्य कक्षात उपचारासाठी ठेवले आहे.
व्दारली येथील जमिनीच्या वादातून आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांचा वाद होता. आमदार गायकवाड आणि भागीदार कंपनीने पंचवीस वर्षापूर्वी व्दारली गावातील एक ग्रामस्थाची महार वतनाची जमीन खरेदी केली होती. व्यवहार पूर्ण होऊन महसूल दप्तरी संबंंधितांची नावे लागली होती. तरीही हा व्यहार पूर्ण होऊ नये म्हणून शहरप्रमुख महेश गायकवाड विक्रेता जमीन मालकाला भडकावून हा व्यवहार हाणून पाडत असल्याचा आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप होता. अनेक महिन्यांपासून सुरू असलेली ही धुसफूस मिटवावी म्हणून हिललाईन पोलिसांनी पुढाकार घेऊन हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला.
गेल्या तेरा दिवसापूर्वी हिललाईन पोलीस ठाण्यात या विषयावर सामोपचाराने चर्चा करण्यासाठी आमदार गायकवाड, शहरप्रमुख महेश गायकवाड वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या दालनात एकत्र बसले असताना, आमदार गायकवाड यांनी अचानक महेश यांच्यावर सहा गोळ्या झाडून त्यांना गंभीर जखमी केले होते. याशिवाय महेशचा सोबती राहुल पाटील याच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. सुरूवातीचे दोन दिवस महेश गायकवाड अत्यवस्थ होते. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. डाॅक्टरांनी अथक प्रयत्न करून महेश यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या शरीरातील गोळ्या बाहेर काढल्या होत्या. मागील तेरा दिवसांपासून महेश यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने रुग्णालय प्रशासनाने त्यांना अतिदक्षता विभागातून सामान्य विभागात हलविले आहे. महेश यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून कल्याण पूर्वेतील अनेक संस्था, धार्मिक संस्थांनी होमहवन केली आहेत.