
खडकत, ता. आष्टी जि. बीड या ठिकाणी खडकत ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. सविताताई शांतीलाल काटे, ग्रामसेवक अमोल करडूळे, स्थानिक पोलीस प्रशासन तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थिती व सहमतीने दि. 23 जानेवारी 2025 रोजी एक ग्रामसभा आयोजित करून गोवंश हत्या व या परिसरामध्ये चालणारे अवैध्य धंदे (गोवंश कत्तल, दारू, जुगार, गुटखा, नदीपात्रातून वाळू उपसा, मटका इत्यादी) कायमस्वरूपी बंद करण्यात बाबत एक ठराव मांडून तो सर्वांच्या सहमतीने पास करण्यात आला. या भागामध्ये अवैध्य गोवंश हत्या होत असून आसपासच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरत असून येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने बीडचे जिल्हाधिकारी यांनी या गावात जनावरे कत्तल करण्यासाठी घेऊन येण्यास व नेण्यास बंदी घातलेली आहे. या परिसरामध्ये अवैध्य पद्धतीने चालणाऱ्या धंद्यांनमुळे युवा वर्ग हा व्यसनाधीन होत असल्याचेही चित्र पाहायला मिळत असून या परिसरातील युवा पिढीची व्यसनापासून मुक्तता करण्यासाठी व खडकत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचे आरोग्य निरोगी व उत्तम राहण्यासाठी अशा पद्धतीचे ठराव सर्वांच्या सहमतीने मंजूर करण्यात आले. याची अंमलबजावणी न केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याचाही प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला.