*महात्मा फुलेंच्या वारसांना न्याय देणारा कृतिशील नेता : सुधीर मुनगंटीवार*
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन होते उपराजधानी नागपूरला… नेहमीप्रमाणे विधानभवन परिसर उपोषण मंडपांनी गजबजलेला. एका मंडपात बॅनर होता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वारसदारांच्या मागण्यांचा… विरोधी पक्षातल्या भाजपाच्या एका आमदाराची गाडी उपोषण मंडपासमोर थांबते… त्या मंडपात महात्मा ज्योतिबा फुलेंची नातसून श्रीमती नीता रमाकांत होले व त्यांचे नातेवाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे उपोषणाला बसलेले.. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार उपोषण मंडपाला भेट देतात. उपोषण कर्त्याशी चर्चा करतात. त्यांचे निवेदन स्वीकारतात. दुसऱ्या दिवशी विधानसभेत सुधीर मुनगंटीवार या विषयावर स्थगन प्रस्तावाची सूचना मांडतात व सरकारला धारेवर धरतात. ज्या फुले दाम्पत्याचे नाव घेऊन काँग्रेस राजकारण करते त्यांच्या वारसदारांवर उपोषणास बसण्याची वेळ यावी असा सवाल मुनगंटीवार करतात. विधानसभा अध्यक्ष सरकारला कार्यवाहीचे निर्देश देतात. पुढे मार्च च्या अधिवेशनात मुनगंटीवार तारांकित प्रश्न उपस्थित करून, कपात सूचना मांडतात व हा विषय रेटून धरतात. शासनाशी सतत पत्रव्यवहार करतात. जुलै च्या अधिवेशनात मुनगंटीवार अर्धा तास चर्चा उपस्थित करतात. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या चर्चेला उत्तर देतात. दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री फुलेंच्या वारसांना विशेष बाब म्हणून नोकरी देतात. सुधीर मुनगंटीवार यांचा संसदीय संघर्ष यशस्वी होतो.
क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्या वाड्याचे नूतनीकरण, भिडेवाड्याची दुरुस्ती अशा मागण्यांचा यशस्वी पाठपुरावा देखील सुधीर मुनगंटीवार यांनीच केला. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात केली त्या पुणे विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी दीड ते दोन वर्ष विधानसभेच्या माध्यमातून संसदीय संघर्ष केला व तो यशस्वी देखील झाला. आता भिडेवाडयात ज्योतीराव आणि सावित्रीबाईंचे स्मारक उभारण्यासाठी मुनगंटीवार पुन्हा संघर्षसिद्ध झाले आहे.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले यांचे नाव घेऊन राजकारण करणारे अनेक नेते महाराष्ट्राने बघितले आहेत पण फुले दाम्पत्याच्या विचारांवर श्रद्धा ठेवत प्रत्यक्ष कृती करून त्यांच्या वारसाना न्याय मिळवून देणारे सुधीर मुनगंटीवार नेहमीच आमच्यासाठी श्रेष्ठतम आहे.
दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती
नीता होले ( महात्मा फुलेंची वंशज )
पुणे