समीर वानखेड़े चंद्रपुर महाराष्ट्र:
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ही निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांचे लक्ष आपल्यावर राहणार आहे, त्यामुळे यात कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी घ्या. तुम्ही सर्वजण सक्षम आहात, मात्र अतिआत्मविश्वास बाळगू नका. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत जबाबदारीची जाणीव ठेवून काम करा, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.
प्रियदर्शनी सभागृह येथे जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित क्षेत्रीय अधिकारी तथा क्षेत्रीय पोलिस अधिका-यांच्या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी मंचावर अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, परिवेक्षाधीन जिल्हाधिकारी डॉ. अपूर्णा भासूर, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, वरोराच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करून आपली जबाबदारी पार पाडावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलिस अधिका-यांच्या कामात एकसुत्रता असावी, कामाचे महत्व व इतर अनुषंगीक बाबींची माहिती देण्यासाठी आज (दि. 24) जिल्हास्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ईव्हीएम सुरक्षितपणे आणणे, ही अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. यात कोणतही हलगर्जीपणा होऊ देऊ नका. तसेच मतदार याद्यांच्या विषय संवेदनशील असल्यामुळे याबाबत अतिशय दक्षता घ्यावी. निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, त्याची सुरक्षित हाताळणी, मॉक पोल आदी बाबींची क्षेत्रीय अधिका-यांना परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. या माहितीबाबत आणि प्रशिक्षणाबाबत आपापल्या क्षेत्रातील इतर अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षित करावे.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मतदानाच्या पुर्वीचा दिवस, मतदानाचा दिवस आणि मतदान संपल्यानंतर पार पाडण्यात येणारी जबाबदारी याबाबत सादरीकरण केले. तसेच अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी केले. प्रशिक्षणाला जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
मतदान केंद्राबाबत इत्यंभुत माहिती ठेवा : सर्व क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय पोलिस अधिका-यांनी आपापल्या क्षेत्रात किती मतदान केंद्र आहेत, तेथे जाण्याचा मार्ग कोणता, त्याचा नकाशा, मतदारांची संख्या, मतदान केंद्रांचे अंतर, सर्व केंद्रांना भेटी देण्यासाठी कोणता मार्ग योग्य राहील, तेथे उपलब्ध होणा-या किमान मुलभूत सुविधा अशा सर्व बाबींचे योग्य नियोजन करून ठेवावे. तसेच अधिका-यांनी आताच मतदान केंद्राला भेटी देऊन पाहणी करावी.
शासकीय वाहनाचाच वापर करा : क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय पोलिस अधिका-यांनी अधिकृत शासकीय वाहनांचाच वापर करावा. कोणतेही खाजगी वाहन वापरू नये. तसेच शासकीय वाहन कुठेही खाजगी जागेत, हॉटेलसमोर थांबवू नये, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.