
छत्रपती संभाजीनगर (अशोक मुळे ) : वाळूज एमआयडीसीतील सुप्रीम सिलिकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आज, २७ ऑक्टोबरला दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत कंपनीतील मशिनरी, कच्चामातल आणि तयार उत्पादन साहित्य जळून खाक झाले. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या कंपनीत टायर मोल्डिंगसाठी लागणारे पॉलिमर तयार केले जाते. आग लागल्याचे लक्षात येताच कर्मचाच्यांनी बाहेर पळ काढला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन कामगार गंभीररित्या भाजल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. एका तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत कंपनीतील महागडी मशिनरी, इलेक्ट्रिकल पॅनेल्स, उत्पादन साहित्य जळून भस्मसात झाले होते. कंपनीचे मालक अभिजीत सूर्यवंशी यांनी सांगितले की, या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी मोठा काळ जाईल. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वाळूज औद्योगिक वसाहतीत मोठी खळबळ उडाली आहे.









