
समीर वानखेड़े चंद्रपुर महाराष्ट्र:
गरिबांना घरकुलाचे वेगळेच महत्त्व असते. घरकुल मंजूर झाल्यावर अतिशय आनंद होतो. मात्र त्याचे रूपांतर वास्तविकतेत होण्यासाठी कधीकधी विलंब होतो. हा विलंब कमी करून नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न त्वरित पूर्ण करण्यावर आपला भर राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना (ग्राामीण) अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व लाभार्थ्यांच्या खात्यात प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम प्रियदर्शनी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावर उद्घाटन करतांना पालकमंत्री डॉ. उईके बोलत होते. मंचावर आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळुंके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत आदी उपस्थित होते.
राज्य स्तरावर पुणे येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील 20 लक्ष लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि 10 लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम होत आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील 49989 लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा दोन, या कार्यक्रमाचे सर्व ग्रामपंचायत आणि पंचायत स्तरावर अतिशय चांगले नियोजन करण्यात आले आहे. गरिबाचे घरकुलचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तांत्रिक अडचणी त्वरीत दूर केल्या जातील.
पुढे ते म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरू झाली आहे. चंद्रपुरातील सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळेल. देशातला एकही पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये, असा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. एक वर्षाच्या आत घरकुलाचे काम पूर्ण करून आजचा कार्यक्रम सार्थ ठरविण्यासाठी आपला प्रयत्न राहील. यासाठी सर्व यंत्रणेने अतिशय गांभिर्याने काम करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केली.
घरकुलच्या अनुदानात वाढ होण्यासाठी आवाज उठविणार : आमदार सुधीर मुनगंटीवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील 49 हजार 989 घरकुलसाठी मंजुरी दिली, त्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे. अन्न, वस्त्र, निवारा या अनिवार्य व मूलभूत गरजा आहेत. आज ज्यांना घरकुल मंजुरी मिळाली आहे, त्यांनी याची माहिती आपापल्या परिसरातील लोकांना द्यावी. जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ मिळू शकेल. घरकुलसाठी मिळणारे अनुदान 1 लक्ष 20 हजार रुपयांमध्ये वाढ करण्यासाठी मी आवाज उठवेल, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. तसेच मनरेगाअंतर्गत मिळणारी 26 हजार रुपये मजुरी वेळेवर मिळावी. सदर घरकुल एक वर्षाच्या आत पूर्ण बांधून व्हावे. घरकुलाच्या रेतीचा प्रश्न प्रशासनाने मार्गी लावावा, अशी मागणीसुध्दा त्यांनी केली.
घर नसलेल्यांना प्रशासनाने घरकुल उपलब्ध करून द्यावे : आमदार किशोर जोरगेवार
राज्यासाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. राज्यातील 20 लक्ष नागरिकांना घरकुल मंजुरी देण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे. आपले स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. पंतप्रधानांनी सर्वांना घरे देण्याचा संकल्प केला आहे. ज्यांच्याजवळ स्वत:चे घर नाही, त्या सर्वांना प्रशासनाने घरे उपलब्ध करून द्यावे, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
गरीबांची गरिबी संपविणारा कार्यक्रम : हंसराज अहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देशाला एक नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांनी प्रत्येक गरजू कुटुंबाला घरकुल उपलब्ध करून दिले आहे. रमाई आवास, शबरी आवास व इतरही घरकुलाच्या योजना राज्य सरकार प्रभावीपणे चालवत आहे. एकही कुटुंब घरकुलापासून वंचित राहणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार अतिशय उत्तम काम करीत असून गरिबांची गरिबी संपवणारा हा घरकुल वाटप कार्यक्रम आहे. भारताच्या घरकुल योजनेचे जगाने अनुकरण करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी केले.
प्रातिनिधीक स्वरुपात घरकुल मंजूरीपत्र वाटप : यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात साईनाथ झुंगरे, यादव बैलमारे, संदीप नागोसे, इंद्रदेव पेंदोर, गृहदास मांढरे, महादेव मारडकर, रोशनी जेनेकर, मूलचंद करंडे, मारुती पाचपाई, श्रीपाद बुरांडे, नितीन बोभाटे, जितेंद्र मोगरकर, सुनिता काकडे, कुसुम राऊत, विनायक मोहितकर, वनमाला जांभुळे आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक (जिग्रावियं) गिरीश धायगुडे यांनी केले. संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार सहायक प्रकल्प संचालक प्रणव बक्षी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक आणि लाभार्थी उपस्थित होते.