समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र :
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच जिल्हा प्रशासनाची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. प्रशासन मतदानासाठी सज्ज असून प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून मतदान पथकाला सर्व बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. याच अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या उपस्थितीत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकामध्ये असलेल्या 1500 कर्मचा-यांचे प्रशिक्षण शहरातील बीजेएम कार्मेल अकादमी येथे पार पडले.
कर्मचा-यांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर आवश्यक असलेले सर्व नमुने व्यवस्थित व काळजीपूर्वक भरून घ्यावे. तसेच उमेदवारांच्या मतांची आकडेवारी असणाला 17 – सी नमुना उमेदवारांच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून द्यावा. सर्वांनी मॉकपोल व्यवस्थितपणे करणे गरजेचे आहे. मतदानाची आकडेवारी अतिशय गांभिर्याचे व अचूक पध्दतीने भरावी. यात कोणतीही चूक होऊ देऊ नका. आपल्या मनातील सर्व शंकांचे प्रशिक्षणात समाधान करून घ्यावे. काही अडचणी असल्यास तिसरे प्रशिक्षण 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे, तेथे विचारून घ्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. यावेळी त्यांनी पोस्टल बॅलेट सुविधा केंद्राची सुद्धा पाहणी केली.
प्रशिक्षणाला चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, रविंद्र भेलावे, मनुष्यबळ व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी अनिकेत माने, नायब तहसीलदार राजू धांडे, सचिन खंडाळे यांच्यासह 1500 कर्मचारी उपस्थित होते.