प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि
वंचित बहुजन आघाडीची आरक्षण
बचाव यात्रा उद्यापासून सुरू होणार
ॲड. प्रकाश आंबेडकर : महाराष्ट्रात सलोखा कायम रहावा यासाठी आरक्षण यात्रा.
मुंबई : महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. सलोखा टिकून रहावा या दृष्टिकोनातून आम्ही 25 तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करत आहोत. उद्या चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना, बुलढाणा आणि औरंगाबाद या जिल्ह्यातून आरक्षण बचाव यात्रा जाणार आहे. ७ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा होऊन या यात्रेची सांगता होणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, एकीकडे ओबीसी समाज प्रचंड घाबरलेला आहे. विशेषतः छोटा ओबीसी घटक घाबरलेला आहे. 12 दिवसांत लहान ओबीसी नेत्यांवर हल्ला झाला आहे. नाभिक समाजाची दुकाने जाळली आहेत. जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे की, लहान ओबीसींच्या दुकानावर जायचे नाही, काही विकत घ्यायचे नाही असेही आदेश निघाले आहेत. ही परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे.
मध्यंतरी शरद पवार यांचे स्टेटमेंट होते की, आम्ही विधानसभेला 225 आमदार निवडून आणणार आहोत. यामुळे राज्यातील परिस्थिती अजून भयाण झालेली असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना, संघटनांना पक्षाच्या वतीने आम्ही निमंत्रणाचे पत्र लिहिले आहे ते यामध्ये सामील होत आहेत. शरद पवार हे विरोधी पक्षात आहेत त्यांनाही या यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. शांतता प्रस्थापित करणे आणि जनजागृती करणे हा आरक्षण बचाव यात्रेचा हेतू असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी नमूद केले.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर