
वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेफेड्रॉन (M.D.) या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी बाळगलेल्या एका आरोपीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी मोठी कारवाई केली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी या कारवाईत 33.04 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आला असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1,65,000 रुपये इतकी आहे. दारूबंदीच्या काळात आरोपी हनीफ करीम शेख हा दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे, मात्र दारूबंदी उठल्यावर आता पुढे काय? असा प्रश्न उभा ठाकल्याने हनीफ ने अंमली पदार्थाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. लाखो रुपयांचे मेफेड्रोन पावडर विक्रीसाठी हनीफ ने घरी आणले होते मात्र चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या गुप्तचर यंत्रणेला माहिती मिळाली आणि हनीफ च्या राहत्या घरी इंदिरानगर येथे पोलिसांनी छापेमारी करीत मेफेड्रोन जप्त केले. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 323/25 अन्वये भारतीय अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 (NDPS Act) च्या कलम 8(क) आणि 22(ब) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपीचा ताबा पुढील तपासासाठी रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रीला आळा घालण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पुढील तपास रामनगर पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाई पथकात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, सफौ स्वामीदास चालेकर, पो. हवा. प्रकाश बलकी, किशोर वैरागडे, अजय बागेसर, जय सिंग, नापोशि संतोष येलपुलवार, पो. शि. प्रमोद कोटनाके, नितीन रायपूरे, गोपीनाथ नरोटे, मिलिंद जांभुळे, आणि चापोहवा प्रमोद डंभारे या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.