पुणे, दि-२३, प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर: पुण्यातील भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा, स्त्री शिक्षणाचे उगमस्थान, स्त्री मुक्ती चळवळीचा जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार आहे. हा विषय घेऊन ‘भिडे वाडा बोलला’ या सुप्रसिद्ध कवितेचे कवी प्राथमिक शिक्षक विजय वडवेराव यांनी *भिडे वाडा बोलला* या राष्ट्रीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत भारतातीलच नव्हे तर विदेशातील कवी देखील सहभागी होणार आहेत. विदेशातून आतापासूनच कवितांचा ओघ सुरू झाला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी सन १८४८ साली पुण्यात बुधवार पेठ येथील भिडे वाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत शिकवायला फातिमाबी शेख या सुध्दा सावित्रीबाईंसोबत सहकारी स्त्री शिक्षिका होत्या. आद्य क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांनी या शाळेसाठी महात्मा फुले यांना संरक्षण पुरवले होते. अशा स्त्री शिक्षणाच्या उगम स्थानाची, बहुजनांच्या ऐतिहासिक प्रेरणा स्थळाची जी इतकी वर्षे दुरावस्था होती,
तेव्हापासून ते आता भिडे वाड्याचे होऊ घातलेले भव्य राष्ट्रीय स्मारक इथवर भिडे वाड्याचा आत्मकथनपर प्रवास या रचनेत अपेक्षित आहे.
भिडे वाडा ( देशातील मुलींची पहिली शाळा) स्त्री शिक्षणाचे उगमस्थान , स्त्री मुक्ती चळवळीचा आशय केंद्रबिंदू असलेली रचना असावी.
स्पर्धेसाठी कसल्याही प्रकारचे प्रवेश मूल्य नसल्याचे आयोजकांनी सांगितले.
अक्षरछंद, वृत्तबद्ध कविता, गजल, पोवाडा, भारुड, मुक्तछंद अशा कोणत्याही काव्य प्रकारात ही रचना लिहिता येऊ शकेल. कवितेसाठी ५० ओळींची मर्यादा दिलेली आहे. संपूर्ण भारतातून (भारता बाहेरीलही) कोणत्याही वयोगटाची व्यक्ती या राष्ट्रीय काव्य स्पर्धेत भाग घेऊ शकते. फक्त रचना स्वरचित असावी.
स्पर्धेसाठी कविता पाठवण्याची अंतिम तारीख १ मार्च २०२४ अशी आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाला पाच हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक असे बक्षिसाचे स्वरूप आहे. तर द्वितीय क्रमांकाला तीन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक तर तृतीय क्रमांकाला दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक देण्यात येईल. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके १० आहेत. प्रत्येकी एक हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह , शाल, पुस्तक असे बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दि.३१ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह, टिळक रोड, पुणे येथे सायं. ५ वाजता होणार आहे.
भिडे वाड्या सारख्या देशातील मुलींची पहिली शाळा असलेल्या, स्त्री शिक्षणाचे उगमस्थान असलेल्या, स्त्री मुक्ती चळवळीचा केंद्र बिंदू असलेल्या ऐतिहासिक वास्तूबद्दल , महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा बी शेख , वस्ताद लहुजी साळवे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल लोकांनी माहिती शोधावी, वाचन करावे, अभ्यास करावा व आशयघन लेखन करावे या एकमेव उद्देशाने या राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन केल्याचे
आयोजक विजय वडवेराव यांनी सांगितले.
सुरुवातीला ही काव्य लेखन स्पर्धा राज्यस्तरीय ठेवली होती पण महाराष्ट्राबाहेरील गोवा, कर्नाटक, गुजरात, या राज्यातून, सिल्वासा येथून कवींनी संपर्क साधून काव्यलेखन स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा दर्शवून या स्पर्धेसाठी आपल्या रचना पाठवल्याने या स्पर्धेचे स्वरूप आपोआपच राष्ट्रीय झाले. स्पर्धेसाठी भारताबाहेरील इतर देशांतूनही कविता येण्याची शक्यता असल्याने ही काव्य लेखन स्पर्धा आंतरराष्ट्रीय होऊ शकते
स्पर्धेसाठी कविता पाठवण्याची अंतिम मुदत १ मार्च २०२४ पर्यंत आहे.
आलेल्या कवितांमधून काही निवडक कवितांचा ‘भिडे वाडा बोलला’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात समावेश करणार असल्याचे काव्य संग्रहाचे संपादक व स्पर्धेचे आयोजक प्राथमिक शिक्षक कवी विजय वडवेराव यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी आपली रचना विजय वडवेराव यांच्या 9021097448 या व्हॉट्सॲप नंबरवर किंवा vijaywadverao@gmail.com या मेल आयडीवर
दि. १ मार्च २०२४ पर्यंत पाठवावी, असे आवाहन आयोजक कवी विजय वडवेराव यांनी केले आहे.