प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर-मालेगाव : शिरपूर येथील आई सप्तशृंगी देवीच्या मानाचा रथ काल मालेगांव शहरात सायंकाळच्या आत पोहचून तो प्रचंड जल्लोषात सप्तश्रृंग गडाकडे रवाना झाला. गेल्या काही वर्षांपुर्वी या रथयात्रेवर काही समाजकंटकांकडून बाधा निर्माण करुन अशांतता माजवण्याचा प्रकार केल्याने यावर्षी तसा कुठलाही प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती.
परवा सायंकाळ पूर्वीच शिरपूरचा रथ दरेगांव मार्गे मालेगांव शहरात दाखल झाला. यावेळी ठिकठिकाणी मुस्लीम बांधवांनी यात्रेकरू भाविकांसाठी पाणी व सरबताची व्यवस्था केली होती. त्याचा लाभ यात्रेकरुंनी घेतला. अप्पर पोलीस अनिकेत भारती, उपअधिक्षक अधिक्षक तेजबीरसिंग संधू यांनी या यात्रेच्या स्वागतावेळी स्वतः जातीने हजर राहत प्रचंड पोलीस बंदोबस्त दिमतीला ठेवला होता. मच्छीबाजार, बस स्थानक परिसरातून रथ सायंकाळी सुर्य मावळती पुर्वीच शिवतीर्थ येथे आला. तेथे या रथाचे परंपरेनुसार रामदास बोरसे, भरत पाटील, जितेंद्र देसले, निखिल पवार, कैलास शर्मा, संदीप अभोणकर आदींनी छ. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रथाचे नेतृत्व करणाऱ्या शिरपूर करांचे यथोचित स्वागत केले. आणि रथ सटाणानाका, सोयगांव मार्गे सप्तश्रृंग गडाकडे रवाना झाला.
रथाचे मालेगाव शहरातील आगमन आणि शहरातून पुढे रवानगी विनासायास सुखरुप पार पडल्याने पोलीस प्रशासनाने आयोजकांचे व शहर वासियांचे आभार मानले. कुलजमाती तंजीमचे जबाबदार मान्यवर व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.