प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर -मालेगाव : सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवास मंगळवार पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त खान्देशातून मोठ्या प्रमाणावर भाविक गडावर पायी जात असतात. या पार्श्वभूमीवर पोलीसांनी शहरात वाढीव बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी २५ अधिकारी, ५०० कर्मचारी, एक दंगा नियंत्रण पथक, दोन राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या तैनात केल्या जाणार आहे. समाजकंटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी १ २ठिकाणी फिक्स पॉइंट निश्चित करुन दरेगाव नाका ते सटाणा नाका दरम्यान ठिकठिकाणी ५० सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहे.
गेल्या वर्षी पदयात्रेदरम्यान जूना आग्रा रोडवर दगडफेकीचा प्रकार घडला होता. शहराचा पुर्व इतिहास व लोकसभा निवडणूक लक्षात घेता पोलीसांनी यंदा कडक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. चैत्रोत्सव सुरु होत असल्याने गडावर पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे. दरवर्षी भाविक शहरातील जुन्या आग्रा रोडने गडाकडे मार्गस्थ होत असतात. पदयात्रे दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी सोमवारी नियंत्रण कक्षात सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
या ठिकाणी फिक्स पॉइंट
यात्रा मार्गावरील संवेदनशील १२ ठिकाणी फिक्स पॉइंट निश्चित केले आहेत. यात दरेगाव फाटा, देवीचा मळा, शिवाजी महाराज पुतळा, नवीन बसस्थानक, मोसम पुल, सटाणा नाका, टेहरे चौफुली, येथे कायम बंदोबस्त तैनात राहील. पदयात्रा मार्गावरील ६ मशिदींसमोर राज्य राखीव दलाचे सशस्त्र जवान तैनात राहणार आहेत. दरेगावनाका ते शिवतिर्थ दरम्यान ३०० तर मोसम पुल ते सटाणानाक्यादरम्यान २०० पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गस्ती पथकांद्वारे या मार्गावर नियमित गस्त सुरु राहील.