प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर-नाशिक : बांधकाम व्यावसायिकाने फसवणूक केल्याने त्याविरोधात जिल्हा ग्राहक मंचात आलेल्या तक्रारदार महिलेकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
जिल्हा ग्राहक मंच येथील अभिलेखाकार धीरज मनोहर पाटील (४३), शिरस्तेदार सोमा गोविंद भोये (५७) असे दोघा संशयितांची नावे आहेत. तक्रारदार महिलेच्या फिर्यादीनुसार, त्यांनी सावतानगर येथील राधा क्लासिक अपार्टमेंटमध्ये २७ लाख ५० हजारांचा फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी त्यांनी ३ लाख ७० हजारांचा अॅडव्हान्स दिला होता.
परंतु बिल्डरने त्यांची फसवणूक करून त्यांचे नावावर परस्पर इंडिया बुल फायनान्सकडुन कर्ज मंजुर करून ते पैसे स्वतः परस्पर घेतले. तसेच त्यांना फ्लॅटचा ताबाही दिला नाही. यासाठी तक्रारदार महिलेने नाशिक जिल्हा ग्राहक मंचामध्ये दावा दाखल केला होता. त्यांचा दावा लवकर सुनावणीस घेण्यासाठी व त्यांना त्यांच्या कामासाठी पाहिजे असलेल्या फाईलचे कागदपत्र देण्यासाठी लाचखोर धीरज पाटील याने ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदार महिलेने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार ‘लाचलुचपत’च्या पथकाने त्यास पंचासमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तसेच संशयित भोये याने तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने त्यांच्याही विरोधात कारवाई केली.
याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ‘लाचलुचपत’च्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्वजीत जाधव, प्रणय इंगळे, सुनिल पवार यांनी बजावली.