अन्य खबरेमनोरंजनमहाराष्ट्र

नाशिक येथे रविवारी खान्देश विभागीय गझल संमेलन

उत्तर महाराष्ट्रातील नामांकित ७० गझलकारांची उपस्थिती


नाशिक: (प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर) : महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था गझल मंथन साहित्य संस्था, खान्देश विभागीय कार्यकारिणी आणि नाशिक जिल्हा कार्यकारिणीतर्फे नाशिक येथे रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी खान्देश विभागीय एक दिवसीय गझल संमेलन होत आहे. या संमेलनाला उत्तर महाराष्ट्रातील नामांकित ७० गझलकारांची उपस्थिती लाभणार आहे.

सुप्रसिद्ध गझलकार डॉ. शिवाजी काळे हे संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक डॉ. आशिष मुजुमदार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. तर गझल मंथन साहित्य संस्थेचे सचिव जयवंत वानखडे, ज्येष्ठ गझलगुरू उर्मिला बांदिवडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गझल मंथन साहित्य संस्था राज्यात सदैव गझलेचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करीत आहे. महाराष्ट्रातील सुमारे ७०० गझलकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गझल मंथन साहित्य संस्थेने विभागीय स्तरावर गझल संमेलन भरविण्याचे ठरविले आहे. त्याची सुरवात नाशिकपासून होत आहे. नाशिक येथे ११ फेब्रुवारी रोजी खान्देश विभागीय गझल संमेलन होत आहे. या संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील सुमारे ७० नामांकित गझलकार सहभागी होणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या

मुशायऱ्यांचे अध्यक्षपद संतोष कांबळे, शाम खामकर, संजय गोरडे, राज शेळके, अरुण सोनवणे, हिरालाल बागुल आदी सुप्रसिद्ध गझलकार भूषवतील. तर यशश्री रहाळकर, अलका कुलकर्णी, नंदकिशोर ठोंबरे, संध्या भोजने, बाळासाहेब गिरी, अंजना भंडारी हे गझलकार मुशायऱ्यांचे सूत्रसंचालन करतील.

सहभागी गझलकारांना आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. हे गझल संमेलन दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत तूपसाखरे लॉन, मुंबई नाका, नाशिक येथे होणार आहे. गझल रसिकांनी या संमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, नाशिक जिल्हाध्यक्षा मृणाल गीते,  विभागीय अध्यक्ष काशिनाथ गवळी, अतुल देशपांडे, स्मिता बनकर, गोरख पालवे, नितीन गाडवे, खान्देश विभागीय कार्यकारिणी आणि नाशिक जिल्हा कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.

________________________

भरत माळी

प्रसिद्धी प्रमुख

गझल मंथन साहित्य संस्था (रजि.)

मो. 9420168806

Back to top button
error: Content is protected !!