
प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव..,
बारामती नगरपरिषदेच्या स्थगित निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण माध्यमांचा अवलंब करत असतानाच, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांनी बारामतीकरांसाठी विकास, सुविधा आणि सामाजिक सुरक्षेचा समतोल साधणारा सर्वसमावेशक वचननामा जाहीर केला आहे. या हटके जाहीरनाम्यामुळे शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महिला, ज्येष्ठ व दिव्यांगांसाठी विशेष योजना
या वचननाम्यात महिलांच्या बचतगटांना उद्योगासाठी कर्ज, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यविषयक विशेष योजना अंतर्गत दरमहा ६०० रुपयांची मदत, तसेच दिव्यांग नागरिकांना आर्थिक सहाय्य व उद्योगासाठी कर्ज देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
वाहतूक, सुरक्षा व पायाभूत सुविधांवर भर
ट्रॅफिकमुक्त बारामतीसाठी प्रत्येक चौकात सिग्नल व्यवस्था, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही निगराणी, रिक्षाचालक व पथविक्रेत्यांसाठी हक्काची जागा, तसेच व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष योजना राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
सूर्यनगरी, तांबेनगर, महिला सोसायटी व व्यापाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सिटी इन चौक पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
कर सवलत व थेट नागरिकसेवा
घरपट्टी व पाणीपट्टीत ३ टक्के कपात, स्वतंत्र तक्रार निवारण दालन, मोबाईल व्हॅनद्वारे नगरपरिषदेच्या सेवा थेट नागरिकांच्या दारात पोहोचवण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ई-रिक्षा प्रवास ही विशेष आकर्षण ठरली आहे.
शिक्षण, रोजगार व सामाजिक न्याय
नगरपरिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व उच्चशिक्षित शिक्षकांची नेमणूक, २०१८ नंतरच्या कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, उद्योगासाठी कर्ज, तसेच प्रत्येक बेरोजगार तरुणाला दरमहा ६०० रुपयांची मदत देण्याची घोषणाही वचननाम्यात करण्यात आली आहे.
स्वच्छ, पारदर्शक व २४ तास उपलब्ध नगरपरिषद
प्रत्येक पात्र नागरिकाला हक्काचे घर, प्रत्येक घर व सोसायटीमध्ये सोलार प्रकल्प, विकासासाठी जमीन गेलेल्यांना योग्य मोबदला, तसेच भ्रष्टाचारमुक्त, एका फोनवर समस्या सोडवणारी व २४ तास नागरिकांच्या सेवेत असणारी आदर्श नगरपरिषद घडवण्याचा संकल्प पठाण मोहसिन अकबर यांनी व्यक्त केला.
या वचननाम्याच्या माध्यमातून त्यांनी किटली या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन केले असून, लोकाभिमुख व सर्वसमावेशक आश्वासनांमुळे या जाहीरनाम्याची बारामतीत जोरदार चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे.














