
सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी भद्रावती तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णालयीन कामकाज व आरोग्य यंत्रणेच्या व्यवस्थापनाची तपासणी केली.
रुग्णालयीन तपासणीत त्यांनी रिक्त पदांबाबत विचारणा करून, सदर पदे त्वरित कशी भरता येतील याबाबत सूचना व मार्गदर्शन केले. यात स्त्रीरोगतज्ञ, सुरक्षा रक्षक इत्यादी पदांचा समावेश होता. रुग्णालयीन कामकाज, स्वच्छता व रुग्णसेवा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून रुग्णालयीन बाहेरील आवाराची स्वच्छता व परिसर यांचे उत्तम व्यवस्थापन करावे. तसेच रुग्णालयात फर्निचर व साहित्य यांचे नूतनीकरण/सुधारणा करणेकरिता जिल्हास्तरावर त्यांची मागणी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र भद्रावती येथे भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील परिसर स्वच्छता व अंतर्गत स्वच्छता याची पाहणी केली. दैनंदिन बाह्यरुग्ण सेवा, आकस्मिक सेवा, औषध विभाग, प्रयोगशाळा, लसीकरण इत्यादी विषयी माहिती जाणून घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष देवतळे यांनी दररोज 100 च्यावर रुग्णांची तपासणी होत असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ओपीडी रजिस्टर व सर्व नोंदी तपासून रुग्णालयात पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रुग्णालयातील आवश्यक मनुष्यबळ उपलब्धता, नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे, तसेच दोन आरोग्य सेविकेचे पद रिक्त असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर यांनी दिली. सदर पदे भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. रुग्णालय परिसरात लसीकरण कक्ष बांधून देण्यात यावा, अशी मागणी डॉ. देवतळे यांनी केली. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येत असलेल्या विशेष सेवा तसेच अंतर्गत स्वच्छता बघून जिल्हाधिकारी यांनी डॉ. आशिष देवतळे व सर्व कर्मचारी यांचे कौतुक केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी झेनिथ चंद्रा, तहसीलदार राजेश भांडारकर, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, मुख्याधिकारी विशाखा शेळकी उपस्थित होते.