A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

समीर वानखेडे:
भुसावळची सानवी आनंद सोनवणे हिने थायलंडमध्ये पार पडलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. 18 ते 20 जून 2025 या कालावधीत रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने थायलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतासह सहा देशांचे खेळाडू सहभागी झाले होते.

सानवी ही पोदार इंटरनॅशनल स्कूल, भुसावळ येथील इयत्ता 6 वी मधील विद्यार्थीनी असून ती आंबेडकर नगर, भुसावळ येथे राहते. तिने आपल्या वयोगटातील प्रतिस्पर्धी थायलंडच्या खेळाडूंना मागे टाकत 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके पटकावली आहेत. तिच्या या कामगिरीचा भुसावळसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान असून सानवीच्या यशामागे तिचे कठोर परिश्रम तर आहेच, पण तिचे प्रशिक्षक पीयूष दाभाडे, दीपक सोनार सर यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि तिची आई ज्योती सोनवणे व वडील डॉ. आनंद सोनवणे यांचे सातत्याने दिलेले प्रोत्साहनही कारणीभूत ठरले. सानवीच्या पालकांनी तिला खेळात करिअर करण्यासाठी सर्वतोपरी साथ दिली आहे.

मागील वर्षी सानवीने राज्य व राष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरी करत 1 सुवर्ण व 2 रौप्य पदके मिळवली होती. तिच्या या उल्लेखनीय यशासाठी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, तसेच केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तिला प्रशस्तिपत्र देऊन गौरविले.

सानवीच्या या यशामुळे देशातील इतर युवक-युवतींनाही प्रेरणा मिळत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Back to top button
error: Content is protected !!