
सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब ग्राउंड येथून “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. यात अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जल्लोषात शिवजागर केला.
पदयात्रेच्या उदघाटनप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शिक्षणाधिकारी राजेश पातळे आणि अश्विनी सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाने दिलेली दूरदष्टी, सर्वसमावेशकता, महिलांचा आदर, स्वाभिमान, कल्याणकारी प्रशासन, पेचप्रसंगातून बाहेर पडण्याची निर्भयता, गडकिल्यांची गरज, आरमार, लष्करी शिक्षण, जिंकण्याचे मानसशास्त्र यासारख्या विविध गुणांद्वारे आदर्श व ऐतिहासिक वारसा महाराष्ट्रासाठी अमुल्य आहे.
यावेळी क्रीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी स्वतः पेंटींग द्वारे तयार केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले. या पदयात्रेत जिल्हयातील सर्व क्रीडा संघटना, सामाजिक संघटना, महिला संघटना, जेष्ठ नागरीक, एन.एस.एस, एन.सी.सी., क्रीडाप्रेमी, क्रीडाशिक्षक, खेळाडू, विद्यार्थी, शिवप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने ” जय शिवाजी जय भारत” पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी पथनाटयामधून शिवचरीत्राचे उत्कष्ट सादरीकरण करण्यात आले.
शिवप्रतिमेचे पूजन करुन जिल्हाधिकारी व मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांच्या जयघोषाने प्रियदर्शनी चौक, जटपूरा गेट, रामनगर, डॉ. आंबेडकर महाविद्यालय व चांदा क्लब ग्राउंड अशी भव्य पदयात्रा थाटात व प्रचंड शिवप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाली. विशेष म्हणजे या पदयात्रेत सहभागी विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक पात्रांच्या विविध वेशभूषा साकारल्या होत्या.
जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड, गटशिक्षणाधिकारी श्री. कांबळे, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठीकरे, जयश्री देवकर, जिल्हा युवा अधिकारी, सर्व क्रीडा अधिकारी, मार्गदर्शक, सर्व शाळा, क्रीडा शिक्षक, सर्व प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी या सर्वांनी पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यकमाचे संचालन रजनी पॉल यांनी केले.