A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

चोंडी – चापडगाव परिसरात तात्पुरता रेड झोन घोषित ड्रोन उडविण्यास सक्त मनाई…

प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव.

अहिल्यानगर, दि. ३० मे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चोंडी व चापडगाव परिसरात ३० मे रोजी दुपारी ४ वाजल्यापासून ते ३१ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तात्पुरता रेड झोन घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत ड्रोन उडविण्यास सक्त मनाई करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली आहे.

चोंडी येथे आयोजित जयंती कार्यक्रमासाठी झेड सुरक्षा वर्गवारीतील अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यामध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा समावेश आहे. या मान्यवरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमांदरम्यान छायाचित्रणासाठी ड्रोन उडविण्याच्या घटना यापूर्वी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्हा प्रशासनाकडे या भागात निर्बंध लागू करण्याची विनंती केली होती.

या विनंतीच्या अनुषंगाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा आदेश तातडीच्या परिस्थितीमुळे एकतर्फी स्वरूपात लागू करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील चोंडी आणि कर्जत तालुक्यातील चापडगाव परिसरात हे निर्बंध लागू राहणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच इतर लागू असलेल्या कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

#Ahilyanagar #सुरक्षापद्धती #SecurityProtocol #ड्रोनबंदी #DroneBan #कायद्याचेपालन #LawAndOrder

Back to top button
error: Content is protected !!