चंद्रपूर :- नागपूर व अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनीबाबत ‘विशेष अभय योजना 2024-25’ शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने ज्या नझुल जमिनी निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे –प्रिमियम अथवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत, अशा जास्तीत जास्त नझुल जमीनधारकांनी विशेष अभय योजनेचा लाभ घ्यावा तसेच आपल्या नझुल जमिनी वर्ग ‘ब’ मधून ‘अ’ मध्ये करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे. 16 मार्च 2024 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार नागपूर व अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनीबाबत विशेष अभय योजना सन 2024-25 च्या तरतुदी खालीलप्रमाणे विहित करण्यात आल्या आहेत.
1) ज्या नझुल जमिनी निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे – प्रिमियम अथवा अन्यप्रकारे भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत, त्यांनाच सदर योजना लागू राहील. 2) अभय योजना 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2025 या कालावधीसाठीच लागू राहील. 3) नझुल जमिनी निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे – प्रिमियम अथवा अन्यप्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या आहेत, त्यांनाच फ्री होल्ड करण्याकरीता (भोगवटदार – 1) अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील येणा-या बाजारमुल्याच्या 2 टक्के एवढे अधिमुल्य आकारण्यात यावे. फ्री होल्ड करण्याकरीता पुर्वीचा भाडेपट्टा नियमित करणे, शर्तभंग नियमानुकूल करणे संदर्भात पूर्वीच्या अटी कायम राहतील. अभय योजनेत थकीत भाडेपट्ट्याची रक्कम 0.02 टक्के दराने आकारणी करण्यात येईल. 4) निवासी प्रयोजनार्थ प्रिमियम लिलावाद्वारे अन्यप्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनीचे वार्षिक भु-भाडे आकारणी 0.02 टक्के दराने व 31 जुलै 2025 या कालमर्यादेत भरणे अनिवार्य असेल. 31 जुलै 2025 पर्यंत प्रलंबित भु-भाडे न भरल्यास थकीत भू-भाडे व त्यावर वार्षिक 10 टक्के दंडनीय व्याज आकारणी करण्यात येईल. 5) विशेष अभय योजना समाप्तीनंतर 1 ऑगस्ट 2025 पासून शासन निर्णय 23.12.2015 व शासन निर्णय 2.3.2019 च्या तरतुदी लागू राहतील. त्यानंतर भु-भाडे अथवा फ्री होल्ड करण्यास अभय योजनेमध्ये मिळणारे फायदे मिळणार नाहीत. त्यानंतर फ्री होल्ड करण्याकरीता प्रयोजन परत्वे 2 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये निवासी प्रयोजनाकरीता 5 टक्के तर वाणिज्यिक / औद्योगिक प्रयोजनाकरीता 10 टक्के रुपांतरण अधिमुल्य आकारून नझुल जमीन फ्री होल्ड केली जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त नझुल जमीनधारकांनी विशेष अभय योजना 2024-25 चा लाभ घ्यावा व आपल्या नझुल जमिनी सत्ताप्रकार ‘ब’ मधून ‘अ’ मध्ये करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.