समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र:
चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणारा, महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि देशाच्याही बाहेर चंद्रपूरचे नाव पोहोचविणारा ‘चंद्रपूरचा वाघ’ म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचे नाव लोकप्रिय आहे. पण मुनगंटीवार यांचे राजकारण संपवण्यासाठी प्रयत्न सध्या चालू आहे. हे कोण करते आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहीतचं नाही तर खात्री आहे. आता चंद्रपुरात कुरघोडी करून चंद्रपूर ताब्यात घेण्याचा मुख्यमंत्री यांचा तर प्रयत्न नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.
राज्याचे मंत्रिमंडळ जाहीर झाले, पण त्यात मुनगंटीवारांना स्थान देण्यात आले नाही. यामागे कोण आहे, हे साऱ्या महाराष्ट्राला कळले. मुनगंटीवारांना डावलून चंद्रपूरला विकासाच्या प्रवाहापासून लांब ठेवण्याचाच प्रयत्न त्यांनी केला. माजी मंत्री मुनगंटीवार यांनी गेल्या दहा वर्षांत केलेले काम देशभर पोहोचले. अगदी ब्रिटनच्या संग्रहालयात जाऊन महाराजांची वाघनखं भारतात घेऊन आले. त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दखल घेतली. आपल्याशिवाय दुसरं कुणीही मोदींपर्यंत पोहोचू नये, यासाठी फडणवीस काहीही करू शकतात, याचा अनुभव भाजपमधील इतर नेत्यांनीही घेतला आहे.
आता मुनगंटीवारांकडे दुर्लक्ष करायचे आणि चंद्रपूरमधीलच दुसऱ्या आमदाराचे वजन वाढवायचे, हा फडणवीसांचा नवा डाव आहे, असे दिसून येत आहे. त्याशिवाय आमदार किशोर जोरगेवार यांच्यात मुनगंटीवारांचा जाहीर अपमान करण्याची हिंमत होऊच शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री चंद्रपूरच्या विकासाकडे लक्ष देण्याऐवजी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत, असा आरोप आता होऊ लागला आहे.
एका मंडप डेकोरेशनचे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला आमदार करण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांनी एकेकाळी जंग पछाडली. तो कार्यकर्ता म्हणजे चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार होय. मुनगंटीवार माझे गुरू आहेत, असं अभिमानाने सांगत फिरणाऱ्या जोरगेवारांमध्ये आज अचानक आपल्या गुरूचा अपमान करण्याचं बळ कोठून आलं, असा संतप्त सवाल सध्या सर्वसामान्य कार्यकर्ता विचारत आहे.
विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांच्यासाठी राबराब राबले. जोरगेवारांचा विजय निश्चित केला. आज त्याच जोरगेवारांनी एका कार्यक्रमासाठी प्रकाशित केलेल्या पत्रिकेत मुनगंटीवारांचे नाव सर्वांत खालच्या क्रमाला टाकून अपमानाची परिसीमा गाठली.
मा. सां. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आमदार जोरगेवार स्वागताध्यक्ष आहे. अर्थात तेच या कार्यक्रमाचे यजमान आहेत. पण या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याची पत्रिका भाजप कार्यकर्त्यालाच नव्हे तर सर्वसामान्य चंद्रपूरकरांना देखील संताप आणणारी आहे. या पत्रिकेत उद्घाटक म्हणून मुख्यमंत्र्यांचे नाव सर्वांत वर आहे. ते स्वाभाविक देखील आहे.
त्यानंतर माजी मंत्री हंसराज अहीर, विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, स्वतः जोरगेवार या क्रमाने नावं आहेत. त्यानंतर अगदी छोट्या अक्षरांमध्ये ज्या पाहुण्यांची नावं आहेत, त्यातही तिसऱ्या क्रमांकाला मुनगंटीवार यांचं नाव आहे. ज्या नेत्याने तहान, भुक, झोप विसरून चंद्रपूरच्या विकासासाठी परीश्रम घेतले, त्यांचा हा अपमान भविष्यात भाजपसाठीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.