A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

माणिकगड सिमेंट कंपनीवर प्रदूषण प्रकरणी कारवाई; ६५ लाखाची बँक गॅरंटी जप्त – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

समीर वानखेडे ब्यूरो चीफ :
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनी प्रदूषण नियंत्रण संयंत्राचा वापर करत नसल्याबाबत प्रदूषणाच्या प्राप्त तक्रारींवरून संबंधित उद्योगाविरोधात त्या-त्या वेळी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून आतापर्यंत सुमारे 65 लाखाची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य सुधाकर अडबाले यांनी याविषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले, कंटीन्युअस एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम (सीएएमएएस) आणि ऑनलाईन कंटीन्युअस एमिशन मॉनिटरिंग सिस्टीम च्या माध्यमातून उद्योगाचे प्रदूषण विहित मर्यादेत असल्याचे तपासले जात आहे.

डंपिंगसारखे विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येत असल्याने त्यास पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे सांगत पर्यावरण मंत्री मुंडे म्हणाल्या, विधिमंडळ सदस्यांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारी संदर्भात पुन्हा एकदा तातडीने अधिकारी पाठवून त्याची पडताळणी केली जाईल.

आरोग्याच्या समस्या सोडविण्याकरिता आरोग्य विभागामार्फत कॅम्प आयोजित केले जात असल्याचे सांगून संबधित उद्योगाला घनकचरा साठवणूक बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जे उद्योग प्रदूषण संदर्भातील नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पर्यावरण मंत्री मुंडे यांनी दिला.

Back to top button
error: Content is protected !!