
प्रतिनिधी-राविराज भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव
जालना : ग्रामीण भागातील गरीब नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर लाचखोरी होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. घरकुल मंजुरीपासून अंतिम हप्त्यापर्यंत विविध टप्प्यांवर नागरिकांकडून ३ हजार ते ३० हजार रुपये उकळले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गोठा मंजुरीसाठी स्वतंत्रपणे सुमारे ५ हजार रुपये मागितले जात असल्याचेही उघड झाले आहे.
माहितीनुसार, पंचायत समिती अंतर्गत काम करणारे काही कर्मचारी, ग्रामसेवक तसेच मध्यस्थ खासगी व्यक्ती यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे. लाभार्थ्यांना फाईल पुढे नेणे, तपासणी करणे, नोंदी करणे, हप्ता मंजूर करणे यांसाठी पैसे मागितले जात असल्यामुळे गरीब नागरिक आर्थिक अडचणीत सापडत आहेत.
गेल्या तीन वर्षांत अशा प्रकारच्या अनेक तक्रारी समोर आल्याचे सांगितले जात असून काही ठिकाणी चौकशी व कारवाईही झाल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात लाचखोरी थांबलेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
घरकुल योजना ही केंद्र व राज्य शासनाची महत्त्वाची योजना असून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. परंतु भ्रष्टाचारामुळे पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पूर्णपणे पोहोचत नसल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, शासकीय कामासाठी कोणी लाच मागितल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
नागरिकांमध्ये संताप या प्रकारामुळे ग्रामीण भागात संतापाची लाट पसरली असून “गरीबांसाठी असलेल्या योजनांमध्येच पैसे मागितले जात असतील, तर सामान्य माणसाने न्याय कुठे मागायचा?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.





