A2Z सभी खबर सभी जिले की

मी नाराज नाही; आमदार म्हणून जनतेचे प्रश्न मांडणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र:

राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (16 डिसेंबर) नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मुनगंटीवार यांचे नाव नव्हते. त्यानंतर त्यांनी सोमवारी यासंदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेऊन सुमारे दीड तास त्यांच्याशी चर्चा केली. आपण नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन घेतले. नितीन गडकरी हे सुरुवातीपासून आपले मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेतली असे मुनगंटीवार म्हणाले.

आपण कोणत्याही प्रकारे नाराज नाही. आपण कधीही नाराज असू शकत नाही. अनेक वर्ष आपण विरोधी पक्षांमध्ये होतो. त्यावेळी देखील आपण जनतेच्या हिताची कामे केली. आता आपण मंत्री नसलो तरी आमदार म्हणून जनतेच्या हितासाठी संसदीय आयुधांचा वापर करणार आहे. जनतेच्या सेवेचे व्रत आपण घेतले आहे, ते कायम सुरू राहणार असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.

*पक्ष मोठा*

भारतीय जनता पार्टीचे आपण एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. याच जन्मात नव्हे तर पुढील अनेक जन्मातही आपण भाजपमध्ये असू. राष्ट्रसेवा करण्याची संधी आपल्याला भाजपनेच दिली. त्यामुळे पुढील रणनीती ही भाजपचा आमदार म्हणून जनसेवेची असेल. मंत्री म्हणून आपण यापूर्वीही जनतेचीच कामे करीत होतो. आता आमदार म्हणूनही जनतेची कामे करताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

पक्षाने आपल्याला वेगळी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याचे आपल्याकडून कळले आहे. त्यामुळे पक्ष देईल ती नवी जबाबदारी स्वीकारणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाशी संबंधित सर्व पुस्तकांचा पुन्हा आपण अभ्यास करणार आहे. संसदीय आयुधांचा वापर करीत आपण जनतेच्या सेवेचे कामे करणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून अशा प्रकारे वागणूक भाजपमध्ये दिली जात नाही. पक्षाने योग्य विचार करूनच काहीतरी निर्णय घेतला असेल असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपले नाव यादीत असल्याचे सांगितले होते. पण नंतर नाव नव्हते. असेही सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुधीर मुनगंटीवार हे कामकाजामध्ये उपस्थित नव्हते. त्यावर बोलताना ते म्हणाले की, पहिल्या दिवशी फार काही महत्त्वाचे कामकाज नव्हते. मंत्री म्हणून अनेक फाइल्स हाताळाव्या लागतात. अधिकाऱ्यांकडून चर्चेतील मुद्द्यांवर ब्रीफिंग केले जाते. आजचा कोणताही मुद्दा नव्हता. त्यामुळे आपण विधिमंडळात आलो नाही. आपण कोणत्याही परिस्थितीत नाराज नाही. आपण नाराज राहणारे व्यक्ती नाही असे मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा नमूद केले.

Vande Bharat Live Tv News
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!