
अहिल्यानगर – शिवजयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण असताना राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्र, अहिल्यानगर येथे कार्यरत सहायक गुप्तवार्ता अधिकारी सोमनाथ बेरड यांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शिवरायांना मानवंदना अर्पण केली. ते मोहीनीनगर, केडगाव येथे वास्तव्यास आहेत.
शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर पहाटे ०४.५५ ते ०६.३५ या वेळेत अवघ्या १०० मिनिटांत तब्बल ५५५ सूर्यनमस्कार पूर्ण करत त्यांनी जिद्द, शिस्त आणि उत्कृष्ट शारीरिक क्षमतेचे दर्शन घडवले. विभागातील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही नियमित व्यायाम, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर हा पराक्रम त्यांनी साध्य केला.
या उपक्रमामागील उद्देश विक्रम प्रस्थापित करणे नसून तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वसंयम आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा असल्याचे त्यांनी सांगितले. शिवरायांचे पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा, असा संदेश त्यांनी दिला.
शिवजयंती हा केवळ उत्सव नसून स्वाभिमान, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा जागवणारा दिवस आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी प्रा. डॉ. राम बोडखे, गिगाबाईट कॉम्प्युटर केडगावचे संचालक बाबासाहेब वायकर, वकील सुरेश भोर, पोलीस मित्र व समाजातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
प्रतिनिधी : राविराज शिंदे
भारतीय पत्रकार अधिकार परि 12षद, महाराष्ट्र राज्य सचिव








